Common Wealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताची जबरदस्त कामगिरी; 22 सुवर्णासह जिंकले एकूण 61 पदके
Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

बर्मिंगहॅम (Birmingham) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 (Common Wealth Games 2022) मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 61 पदके जिंकली आहेत. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताला कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधून सर्वाधिक पदके मिळाली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये 12 पदके जिंकली आहेत आणि वेटलिफ्टर्सनी 10 पदके जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताला 7 पदके मिळाली आहेत. त्याचबरोबर भारताला बॅडमिंटनमध्ये 3 सुवर्णपदके मिळाली आहेत.

यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले. त्याचवेळी मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 66 सुवर्ण, 57 रौप्य, 54 कांस्य अशी एकूण 177 पदके जिंकून पहिले स्थान पटकावले. दुसरीकडे, इंग्लंड 172 पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा 92 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आज राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुष हॉकी संघाने भारताला शेवटचे पदक मिळवून दिले. मात्र, पुरुष हॉकी संघाला आज सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी झालेल्या सामन्यात 7-0 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुवर्णपदक जिंकले. (हेही वाचा: आशिया चषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, Rohit Sharma च्या हाती कर्णधारपदाची धुरा)

1958 ते 2022 या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला 200 सुवर्णपदके मिळाली आहेत. ही देशासाठी खचितच अभिमानास्पद कामगिरी आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी 1958 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. त्यानंतर बॅडमिंटन स्टार PV सिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याने या खेळांमधील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 200 वर गेली.