Ahmedabad Olympics 2036: अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक 2036 ची तयारी सुरू, 135 एकर जागा केली जाणार रिकामी, पाहा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची 3D छायाचित्रे
अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक 2036 ची तयारी सुरू

Ahmedabad Olympics 2036: भारत 2036 च्या ऑलिम्पिकच्या (Olympics 2036) यजमानपदासाठी दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. गुजरात सरकार अहमदाबाद शहराला ऑलिम्पिक 2036 चे यजमानपद देण्याबाबत गंभीर असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. 2036 ऑलिम्पिकच्या यजमानपदाची बोली जिंकण्याच्या आशेने लवकरच एसव्हीपी क्रीडा संकुलासाठी जागा मोकळी करण्यात येणार आहे. याबाबत जमीन मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सरकारने 135 एकर जमीन लवकरात लवकर रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोटिसा मिळालेल्यांमध्ये आसाराम आश्रम, सदाशिव आश्रम, भारतीय सेवा समाज आश्रम आणि 145 निवासस्थानांचा समावेश आहे. एसव्हीपी कॉम्प्लेक्स आणि रिव्हरफ्रंट बांधल्यानंतर या भागात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सरकार आधुनिक स्टेडियम, क्रीडा संकुल, निवास सुविधा आणि वाहतूक व्यवस्था विकसित करणार आहे.

अहमदाबाद आणि गांधीनगरमधील ऑलिम्पिक-मानक पायाभूत सुविधांच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी जुलै 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) ने, 300 एकरचे सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह बांधण्यासाठी 6,000 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन प्रस्ताव तयार केला आहे.

त्यानंतर आता नुकतेच सरकारने ऑलिम्पिक स्थळाची 3D चित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये आधुनिक स्टेडियम, चालण्याचे मार्ग, हिरवळ आणि आकर्षक इमारती दिसत आहेत. 2036 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी अहमदाबादचे लोक खूप उत्सुक आहेत. या कार्यक्रमामुळे शहराच्या विकासाला, रोजगाराच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Australian Open: रोहन बोपण्णा ठरला ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष, मॅथ्यू एबडेनसह दुहेरीचे विजेतेपद पटकावले)

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2036 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा मान भारताला देईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गुजरात सरकार यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि ऑलिम्पिक शर्यतीत पुढे राहण्याचा प्रयत्न करत आहे. जर भारताची बोली स्वीकारली गेली तर, सरकारने सरदार पटेल क्रीडा संकुलासाठी 4600 कोटी रुपये आणि नवरंगपुरा क्रीडा संकुलासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.