अंबाती रायुडू, एमएसके प्रसाद (Photo Credit: IANS/PTI)

गेल्या वर्षी इंग्लंडमधील विश्वचषकासाठी (World Cup) अंबाती रायुडू (Ambati Rayudu) टीम इंडियामध्ये (India) चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. 2018 मध्ये झालेल्या आशिया चषकात फलंदाजाने आपला ठसा उमटविला आणि भारतीय क्रिकेट संघात नियमित खेळाडू बनला. पण आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीमुळे रायुडूला विश्वचषक संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी अष्टपैलू विजय शंकर याची निवड करण्यात आली. नंतर शिखर धवन याला स्पर्धे दरम्यान दुखापत झाली आणि त्याच्या जागी रिषभ पंतला बोलावण्यात आले. या सर्वांमुळे निराश रायुडूने ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा केली. आणि आता निवड समितीचे आउटगोइंग अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी एका मुलाखतीत या बद्दल मौन सोडले आणि कबूल केले की हैदराबादच्या क्रिकेटपटूबद्दल त्यांना खूप वाईट वाटले. (अंबाती रायुडू च्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मोहम्मद अजहरुद्दीन ने तोडले मौन, 'हताश क्रिकेटर'च्या टीकेनंतर रायुडू ने फटकारले)

45 वर्षीय एमएसके प्रसाद म्हणाले की, रायुडूने 2019 मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु विश्वचषकपूर्वी त्याला संघातून वगळण्यात आले होते. स्पोर्ट्सटरला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी खुलासा केला की, "अंबाती रायुडूची निवड आम्ही आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे केली गेली होती आणि वनडे संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. समितीने रायुडूच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित केले होते, परंतु दुर्दैवाने त्याला विश्वचषक संघातून वगळले. खरंच हा खूप वेगळा मुद्दा होता." प्रसाद पुढे म्हणाले की, “मला रायुडूबद्दल वाईट वाटले. मी हे स्पष्ट करू शकतो की हा निर्णय अत्यंत हृदयस्पर्शी मुद्दा होता. आमच्या निवड समितीला नेहमीच असे वाटते की तो 2016 झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टेस्ट निवडीच्या रडारवर आहे आणि मी त्याला सांगितले की त्याने कसोटी क्रिकेटवर का लक्ष केंद्रित का करत नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही त्याला आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे वनडे संघात स्थान दिले होते जे बर्‍याच जणांना उचित वाटणार नाही, पण ते सत्य आहे."

रायुडूने भारतासाठी एकूण 55 एकदिवसीय सामने खेळले असून 47.06 च्या सरासरीने आणि 79.05 च्या स्ट्राइक रेटने 1694 धावा केल्या. रायडूने शेवटचा वनडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या वर्षी मार्चमध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत रायडूला तीन सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो अवघ्या 33 धावा करु शकला.