भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ आज पुन्हा एका फ्लोरिडाच्या मैदानात आमने-सामने असतील. दोन्ही संघाच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 4 विकेट्सने मात दिली. आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. आज दोन्ही संघात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. टीम इंडियाकडे आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी असणार आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघ आजचा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या निर्धारित असेल. (नक्कीच, एक दिवस 'टीम इंडिया'चा कोच व्हायला आवडेल- सौरव गांगुली)
भारत आणि वेस्ट इंडिजचा आजचा हा सामना तुम्ही ऑनलाइन Hotstar आणि Star Sports वर पाहु शकता.
दोन्ही संघातल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट बॉलींग करत विंडीज फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. आणि विंडीजला केवळ 95 धावांवर रोखले. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. पण भारतीय फलंदाजांनी मात्र सर्वांची निराशा केली. दुखापतीतून संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याला जास्त काही करता आले नाही. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) ही विंडीज गोलंदाजांसमोर हताश दिसला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील संघासाठी जास्त योगदान देऊ शकला नाही.  पण विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सैनी (Navdeep Saini) ने सर्वांच्या मनावर छाप सोडली. सैनीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एका ओव्हरमध्ये लागोपाठ दोन गडी बाद केले. त्याने निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर यांना बाद करून विंडीजला डबल धक्का दिला.