भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी गांगुली क्रिकेटशी संलग्न आहे. सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (Cricket Association of Bengal) अध्यक्ष असून आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाशी संलग्न आहे. गांगुलीची क्रिकेट कॉमेंट्री तर सर्वश्रूत आहे. टीम इंडियाचा कोच होण्याच्या प्रश्नावर गांगुली म्हणाला की, "नक्कीच मला कोच व्हायला आवडेल. पण आता नाही. अजून एक फेज गेल्यानंतर मी नक्कीच त्यासाठी आवेदन करेन."
पुढे तो म्हणाला की, "सध्या मी अनेक कार्यक्रमांत गुंतलेलो आहे. आयपीएल, कॅब, टीव्ही कॉमेंट्री. आधी हे सर्व पूर्ण करतो. पण टीम इंडियाचा कोच तर मी अगदी नक्कीच बनू इच्छितो आणि त्यासाठी माझी अगदी सहज निवडही होईल. मला कोच होण्यात रस आहे मात्र सध्या नाही."
टीम इंडियाच्या प्रशिक्षणपदाच्या निवडीबद्दल गांगुली म्हणाला की, पॅनल काय निर्णय घेईल, हे ठाऊक नाही. मात्र कमिटी योग्य अशा व्यक्तीची प्रशिक्षणपदी निवड करेल. मात्र रवी शास्त्री यांच्या कार्यकाळाबद्दल "मला वाटत नाही मी याबद्दल काही बोलावे. प्रशिक्षणपदाबद्दल निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेपासून मी खूप दूर आहे," असे सांगत गांगुलीने प्रतिक्रीया देण्याचे टाळले. (IND vs WI: टीम इंडियाच्या निवडीवरून सौरव गांगुली आणि विनोद कांबळी यांच्यात Twitter वर शाब्दिक चकमक)
भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, "वेस्टइंडिज खूप चांगली टीम आहे. टी-20 तर त्यांचा आवडता फॉर्मेट असून ते त्याचा खूप आनंद घेतात. तसंच वेस्टइंडिज टी-20 चॅम्पियन देखील आहे. त्यामुळे फ्लोरिडा येथे होणारे दोन्ही सामने आव्हानात्मक असतील."