सौरव गांगुली आणि विनोद कांबळी (Photo Credit: Twitter @SGanguly99/@vinodkambli349 Twitter)

भारतीय संघाच्या (Indian Team) आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी बीसीसीआय (BCCI)  निवड समितीने रविवारी संघाची घोषणा केली. विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. टीम इंडिया 3 ऑगस्ट पासून विंडीज दौऱ्यावर असणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळतील. यंदाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण यात युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) आणि अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना संधी दिली नाही म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) नाराजी व्यक्त केली होती. शुभमनला संपूर्ण विंडीज दौऱ्याला मुकावे लागेल तर राहणेला केवळ टेस्ट सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ODI मालिकेसाठी शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळल्याने सौरव गांगुली निराश; निवड समितीला दिला हा सल्ला)

गांगुलीने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न म्हटले की, "तिन्ही प्रकारच्या संघात समान खेळाडू निवडण्याची वेळ आली आहे. यामुळे खेळाडूंना त्यांच्यात सातत्य राखण्यात मदत होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. सध्याच्या काळात मोजकेच खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्न करू नका, देशासाठी चांगले खेळाडू निवडा.'' यावर माजी क्रिकेटपटू आणि मुंबईकर विनोद कांबळी (Vinod Kambli) याने गांगुलीच्या मतांचा विरोध करत निवड समितीची पाठराखण केली आहे. गांगुलीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत कांबळी म्हणाला, तिन्ही फॉरमॅटसाठी तीन प्रकारचे खेळाडू हवेत जसे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या खेळाडूंना संरक्षित करण्यात मदत होईल."

सामान्यपणे भारतीय संघात प्रत्येक खेळाडूवर एक प्रकारच्या फॉरमॅटचा ठप्पा लागतो. एकीकडे चेतेश्वर पुजाराने टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःची योग्यता सिद्ध करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा याला अजून टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी योग्य मानले जात नाही.