Rishabh Pant वरील प्रकाशझोत थोडे दिवस कमी करा; Rohit Sharma ची प्रेक्षकांना विनंती
रिषभ पंत (Photo Credit: Getty)

सध्या कोणालाच 'रिषभ पंत' व्हायची इच्छा नसेल. कारण गेले काही दिवस पंत प्रेशर कुकर मध्ये आहे. कारण पंतचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरत आहे. त्याला एक फलंदाज म्हणून आणि यष्टीरक्षक म्हणूनही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्याला वगळून रिद्धिमान सहाला घेण्यात आलं होतं. आता बांगलादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्येही त्याच्या यष्टिरक्षणाबद्दल आणि फलंदाजीबद्दल वाईट शेरेच ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे पंत वरचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

रोहित शर्माला मात्र या गोष्टीची चिंता नाही. उलट त्याने प्रेक्षकांनाच एक सल्ला दिला आहे. रोहित म्हणाला, ''रिषभ पंत बद्दल रोज, अगदी प्रत्येक मिनिटाला अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळतात. मला एवढंच वाटतं की त्याला ज्या प्रकारे खेळायची इच्छा आहे त्या प्रकारे त्याला खेळू द्यावं. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकानेच रिषभ पंत वरील प्रकाशझोत थोडे दिवस कमी करायची गरज आहे. तो खूप तरुण आहे. 21-22 व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपला ठसा उमटवू पाहत आहे. जर त्याच्या प्रत्येक कृतीवर आपण चर्चा करायला लागलो तर त्याच्यावर तो अन्याय ठरेल.'' (हेही वाचा. IND vs BAN 2nd T20I: रिषभ पंत याच्या चुकीच्या Stumping वर भडकले Netizens, झाली एम एस धोनी याची आठवण, पाहा Tweets)

रिषभच्या फॉर्म बद्दल रोहित पुढे म्हणाला,''सद्यस्थितीत त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याची आत्ता गरज आहे. माझ्या मते तरी त्याचं कीपिंग दिवसेंदिवस सुधारत चालले आहे. तो एक धडाकेबाज फलंदाज आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्याने त्याला हवं तसं खेळावं."

आज बांगलादेश विरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना होत आहे. आज तरी रिषभ पंतला फॉर्म गवसतो का हे बघणं औत्सुक्याचं आहे. रिषभ पंत हे भारताचं भविष्य असल्या कारणाने लवकरच त्याला सूर गवसावा हीच अपेक्षा.