मुंबई: दादर परिसरातील शिवाजी पार्कात पहिल्यांदाच विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धे (Mallakhamb World Championship) चे आयोजन करण्यात आले होते. काल या स्पर्धेची सांगता झाली. अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेचे अजिंक्यपद माहिला सांघिक गटात भारतीय संघाने प्राप्त केले. भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदावर 244.73 गुण मिळवून आपले नाव नोंदवले, तर 44.45 गुण मिळवून सिंगापूरने आणि 30.22 गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जगातील 15 देशांमधील जवळजवळ 150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारताच्या दीपक शिंदे आणि हिमानी परब यांना सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेच्या सांगता सोहळ्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अशाप्रकारे पहिल्यांदाच मल्लखांबाची विश्व अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहरीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी या 15 देशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्राथमिक फेरीत खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब यांवर सादरीकरण करणे गरजेचे होते. पुरुषांमध्ये पुरेसे संघच नसल्याचे कारण देत सांघिक विजेतेपद रद्द करण्यात आले. यामध्ये साताऱ्याचा कारी मल्लखांब संघ, विले-पार्लेमधील पार्लेश्वर व्यायामशाळा तसेच जर्मनीच्या संघाचा खांबावरील मनोरा लक्षवेधी ठरले. (हेही वाचा : मुंबईत आजपासून रंगणार पहिली मल्लखांब विश्व अजिंक्यपद स्पर्धा; 15 देशांचे 150 खेळाडू सामील)
महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या खेळांपैकी एक म्हणून मल्लखांबाकडे पहिले जाते. या खेळाचा प्रसार व्हावा, हा खेळ खेळणारे खेळाडू एकत्र यावेत या उद्देशाने या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही संपूर्ण स्पर्धा बघण्यासाठी भारतातील विविध राज्यांमधून आजी-माजी मल्लखांब पटूंनी हजेरी लावली होती, तर साडे तीन ते चार हजार प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित होते.