मल्लखांब (Mallakhamb)... मराठी मातीतला एक महत्वाचा खेळ. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून या पारंपरिक खेळाकडे पाहिले जाते. ताकद, वेग, लवचिकता, मानसिक एकाग्रता वाढवणारा हा खेळ आता हळू हळू इतर राज्यांमध्येही पोहचला आहे. मल्लखांबाचे फायदे लक्षात आल्यावर या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानाचे स्थान प्राप्त होत आहे. लोप पावत चाललेल्या या खेळला टिकवून ठेवण्यासाठी तसेच जगातील सर्व मल्लखांबपटूंना एकत्र आणण्यासाठी मल्लखांबाची पहिली ‘विश्व अजिंक्यपद स्पर्धा’ (Mallakhamb World Championship) आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.
16 आणि 17 फेब्रुवारी रोजी, देशविदेशातील मातब्बर मल्लखांबपटूंना एकत्र आणत विश्व मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने भारतीय मल्लखांब महासंघ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्यातर्फे मल्लखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. यजमान भारतासह जर्मनी, झेक रिपब्लिक, बांगलादेश, स्पेन, इटली, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम अश्या एकूण 15 देशांचे 150 खेळाडू आणि अधिकारी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. एका देशातून या स्पर्धेसाठी 6 मुले व 6 मुली असे एकूण 12 जणांचा चमू सहभागी होणार आहे. सांघिक, वैयक्तिक व मानवी मनोरे या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये पोल व रोप मल्लखांब यांचा समावेश असेल. (हेही वाचा : शरीरसौष्ठव पटूंचा चित्तथरारक खेळ रंगणार, येत्या 17 फेब्रुवारी पासून ‘मुंबई श्री’ला सुरुवात)
क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेतील आकर्षण म्हणजे उमेश कदम, तोंडात आणि हातात आगीचे पेटते 9 चुडते घेऊन उमेश मल्लखांबावरील कसरती करणार आहे. शनिवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता उमेशचे हे अग्निदिव्य पार पडेल.