
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टेस्ट क्रिकेट सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने जबरदस्त कामगिरी केली आहे. तीन धावांवर बाद झालेल्या केएल राहुलनंतर मैदानात असलेल्या पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने चांगलाच जम बसवत धावांच्या उभारणीस सुरुवात केली. या सामन्यात पृथ्वीने आपल्या चमकदार खेळीचे दर्शन घडवत आपल्या कारकिर्दीतील शानदार अर्धशतक झळकावले. पृथ्वीने ही कामगिरी सरासरी ९०च्या स्ट्राईक रेटने केली. ज्यात ७ चौकारांचाही समावेश आहे.
पृथ्वी शॉ - चेतेश्वर पुजारा जोडी जमली
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. सामना सुरु होताच सलामीवीर के एल राहुलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने धावा उभारण्याची कामगिरी सुरु केली.
पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम
दरम्यान, भारताकडून डेब्यू करत असलेला पृथ्वी शॉ हा २९३वा खेळाडू आहे. तर, आपल्या पदार्पणातच पृथ्वीने विश्वविक्रम केला आहे. तसाच, तो सध्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात तरुण खेळाडू आहे. पण, दुसरे असे की, पदार्पणातच अर्धशतक झळकवणारा तो पहिलाच खेळाडूही ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली जाईल हे नक्की
भारताने नाणेफेक जिंकली
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.३०वाजता राजकोट येथील स्वराष्ट्र स्टेडियममध्ये खेळला जात आहे.