IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यर याने इयान चॅपल यांना मागे टाकत नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, शतकवीर केएल राहुल ने न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास
श्रेयस अय्यर-केएल राहुल (Photo Credit: Twitter/ICC)

बे ओव्हल (Bay Oval) मैदानात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने (India) न्यूझीलंड (New Zealand) समोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून केएल राहुल (KL Rahul) 112, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 62 धावांचा महत्वपूर्ण डाव खेळला. एकावेळी 100 च्या आत 3 विकेट्स गमावणाऱ्या भारताने न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयसने आपला फॉर्म कायम ठेवला आणि मंगळवारी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानात सुरु असलेल्या तिसर्‍या आणि अंतिम वनडे सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध महत्वपूर्ण अर्धशतक झळकावले. अय्यरने आजवर खेळलेल्या 17 सामन्यात आठ अर्धशतकं आणि एक शतक झळकावले आहे आणि त्याचा सरासरी 49 च्या वर राहिली आहे. त्याच्या नवीनतम अर्धशतकाच्या सौजन्याने अय्यरने ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयान चॅपल (Ian Chappell) यांना मागे टाकून नवीन विश्वविक्रम नोंदविला. (IND vs NZ 3rd ODI: विराट कोहली याची द्विपक्षीय वनडे मालिकेत खराब बॅटिंग, अपेक्षित नसलेल्या 'या' लाजिरवाण्या रेकॉर्डची केली नोंद)

एकदिवसीय मालिकेत 50 पक्ष अधिक धावांमध्ये सर्वोत्कृष्ट टक्केवारीचा विक्रम अय्यरच्या नावावर झाला आहे. श्रेयसने 50 ओव्हरच्या स्वरूपात 16 डावांमध्ये नऊ 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि इथे त्याची सरासरी 56.25 राहिली. यापूर्वी, हा रेकॉर्ड चॅपेल यांच्या नावावर होता ज्यांनी 16 डावात 50.0 च्या सरासरीने 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. दुसरीकडे, भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज राहुलनेही वनडे मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली. यजमान न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यात राहुलने दमदार शतक ठोकले. 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करत राहुलच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीचे हे पहिले शतक आहे. यासह भारताकडून पाचव्या किंवा खालच्या स्थानावर फलंदाजी करत न्यूझीलंडमध्ये शतक झळकावणारा राहुल हा भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. 2015 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावणाऱ्या सुरेश रैनानंतर एकूणच न्यूझीलंडमध्ये पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर न्यूझीलंडमध्ये शतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. शिवाय, पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतासाठी 5 वर्षानंतर फलंदाजाने शतक ठोकले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध राहुलने 104 चेंडूंमध्ये 9 चौकार व 1 षटकारासह शतकी खेळी केली.राहुलने श्रेयसबरोबर100 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर मनीष पांडे च्या मजबूत जोडीमुळे टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासही मदत केली.