IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात Down Under 'या' 5 भारतीयांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, विराट कोहलीही यादीत सामील
विराट कोहली-रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 आणि अखेरीस चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने येतील. वनडे आणि टी-20 मालिकेत भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. रोहितला आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. रोहित संघात नसल्यामुळे विराट कोहलीची (Virat Kohli) जबाबदारी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचा एकदिवसीय रेकॉर्ड खूप चांगला आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्यांची कमतरता नक्कीच जाणवेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीतही रोहित याक्षणी आघाडीवर आहे. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियात विराट कोहली रेकॉर्ड बुकमध्ये घालणार 5 विक्रमांची भर; तेंडुलकर, पॉन्टिंग, ब्रायन लारा यांना पछाडण्याची रन-मशीनला संधी)

ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट कारकीर्दीदरम्यान रोहितने एकदिवसीय सामन्यात 990 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात कांगारू संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. सचिनने 25 सामन्यात 740 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये 629 धावा केल्या असून या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनी 684 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. लिटिल-मास्टर सुनील गावस्कर यांचाही या यादीत समावेश आहे. गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 13 वनडे सामन्यात 456 धावा केल्या आहेत.  दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सचिन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या संघाविरुद्ध मास्टर-ब्लास्टरने 71 सामन्यांत 3077 धावा केल्या, तर रोहितने दुसरे स्थान काबीज केले आहे. रोहितने कांगारू संघाविरुद्ध 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2208 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आतापर्यंत 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1910 धावा केल्या आहेत.

दरम्यान, रोहित यंदाच्या मालिकेसाठी संघात सामील नसला तरी शिखर धवन, केएल राहुल आणि विराटसारखे आघाडीचे फलंदाज आहेत जे कांगारूविरुद्ध धावांचा डोंगर उभा करू शकतात. याशिवाय, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांचे वेगवान त्रिकूट तर रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल आपल्या फिरकी गोलंदाजीने ऑस्ट्रेलियावर दबाव आणण्यासाठी उत्सुक असतील.