Yuzvendra Chahal On Kul-Cha: चहल ने सांगितले- टीम इंडियाची घातक फिरकी जोडी ‘कुलचा’ का तुटली? रवींद्र जडेजाशी कसा आहे कनेक्शन
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल (Photo Credits: Instagram)

Yuzvendra Chahal On Kul-Cha: एक वेळ अशी होती जेव्हा मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांची जोडी टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग इलेव्हनमध्ये जवळपास निश्चित होती. दोंघांच्या फिरकीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण कुलदीप यादव मागील काही काळापासून संघाबाहेर आहे आणि जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. परिस्थिती अशी आहे की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून देखील कुलदीपला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तथापि अखेर भारतीय संघाची (Indian Team) घातक फिरकी जोडी, ‘कुलचा’, का तुटली यावर चहलने नुकतंच मौन सोडलं. (‘माही भाई गेल्यापासून...’, टीम इंडिया, IPL मध्ये पुरेशी संधी मिळत नसल्याने Kuldeep Yadav ने बोलून दाखवली मनातील खंत)

स्पोर्ट्स तकशी बोलताना युजवेंद्र चहल म्हणाला, “जेव्हा मी आणि कुलदीप खेळत होतो, तेव्हा हार्दिक पंड्या संघात होता. 2018 मध्ये हार्दिकला दुखापत आणि रवींद्र जडेजा मर्यादित ओव्हरमध्ये संघात परतला. जडेजा हा फिरकीपटू होता आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा खेळाडू होता. हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज अष्टपैलू असता तर आम्ही दोघेही एकत्र खेळू शकलो असतो.” तो पुढे म्हणाला, “कुलदीप आणि मी प्रत्येक मालिकेत अर्धा-अर्धा सामने खेळलो. काही वेळा असे झाले की पाच सामन्यांच्या मालिकेत तो तीन वेळा खेळला आणि काही वेळा माझ्यासोबत असेच घडले. संघ संयोजनाची चर्चा आहे.11 खेळाडू मिळून टीम बनते आणि ‘कुलचा’ त्यामध्ये फिट बसत नव्हते. जोपर्यंत हार्दिक संघात होता तोपर्यंत आम्ही दोघे होतो. आम्हाला संधी मिळाली. माझ्यासाठी संघ जिंकणे अधिक महत्वाचे आहे. जर मी संघात नसलो आणि संघ जिंकत असेल तर यामुळे मला आनंद होईल.”

उल्लेखनीय आहे की युजवेंद्र चहल हा अद्यापही टीम इंडियाचा भाग आहे, पण कुलदीप संघात आत-बाहेर होत राहतो. शिवाय, नुकतंच कुलदीपनेही कबूल केले की धोनी संघात नसल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी झाला आहे. इतकंच नाही तर कुलदीप गेल्या काही वर्षांपासून केकेआर संघाकडून आयपीएल खेळत आहे, पण यंदा त्याला चेन्नई येथील स्पर्धेच्या सामन्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही जे सर्वांनाच चकित करणारे होते.