बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ (Photo Credits: Getty)

क्रिकेटसाठी वर्ष 2019 मनोरंजक आणि मजेदार राहिले. यंदाच्या वर्षी इंग्लंड (England) मध्ये क्रिकेट विश्वचषकचे (World Cup) आयोजन करण्यात आले, आणि यजमान संघाने अगदी रोमांचक फायनल मॅचमध्ये सामना जिंकला. या स्पर्धेतून, एक वर्षाच्या बंदीनंतर खेळातील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यावर्षी भारतीय (India) कर्णधार विराट कोहली, स्टीव्हने कसोटी क्रिकेट वर्चस्व गाजवले, तर इंग्लंडचा विश्वचषक हिरो बेन स्टोक्स (Ben Stokes) याने शानदार खेळीने इतिहासाची रचना केली. भारताचा जसप्रीत बुमराह जगातील पहिला नंबरचा गोलंदाज ठरला, तर रवींद्र जडेजा याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस (Ashes) मालिकेत वर्चस्व राखले, तर अफगाणिस्तानने बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिका जिंकण्याची धक्कादायक कामगिरी बजावली. (Year Ender 2019: अयोध्या राम मंदिर ते राफेल खटल्यापर्यंत यंदा सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या 'या' महत्वपूर्ण निर्णयांचा आढावा)

हे वर्ष वेस्ट इंडीज (West Indies) आणि श्रीलंका (Sri Lanka) सारख्या काही संघांसाठी चढउतारांनी भरलेले होते तर न्यूझीलंड आणि इंग्लंडने काही अपवादात्मक क्रिकेटचे प्रदर्शन केले. येथे आपण क्रिकेटमधील वर्षातील पाच संस्मरणीय घटनांकडे मागे वळून पाहू:

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक फायनल

जुलै महिन्यात लॉर्ड्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाची 45 वर्षांची प्रतिक्षा संपविली. 50 ओव्हरच्या क्रिकेट विश्वचषकच्या फायनलचा हा आजवरचा सर्वात थरारक अंतिम सामना ठरला. अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या नाबाद 84 धावांनी इंग्लंडला न्यूझीलंडच्या 214 धावांची बरोबरी मिळवून दिली. अंतिम सामना अनेक चढउतारांनी भरलेला होता आणि शेवटच्या बॉलपर्यंत कोणीही विजेत्याचा अंदाज घेऊ शकत नव्हता. शेवटच्या षटकात इंग्लंडला एका विशिष्ट चेंडूवर 6 धावा दिल्या, ज्याने यजमानांचा विजय निश्चित झाला. सामना बरोबरीत राहिला, आणि त्यानंतर सुपर ओव्हरदेखील अनिर्णित राहिल्याने यजमानांनी सर्वाधिक चौकाराच्या आधारावर जेतेपद पटकावले.

भारताचा सलग 12 वा टेस्ट मालिका विजय

टीम इंडियाची कामगिरी 2019 अर्थात या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये समाधानकारक राहिले. विश्वचषकमधील पराभव मागे टाकत टीम इंडियाने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि नंतर बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिका जिंकल्या. बांग्लादेशविरुद्ध एडन गार्डन्स टेस्ट सामन्यातील विजय भारतीय संघाचा सलग 12 मालिका विजय होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने जिंकलेल्या या सर्वाधिक मालिका आहेत. विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताने 53 कसोटींमध्ये 33 कसोटी सामने जिंकले आहेत.

डेविड वॉर्नरचे तिहेरी टेस्ट

शतकपाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने तिहेरी शतक झळकावले. त्याने 389 चेंडूत तिहेरी शतक पूर्ण केले. वॉर्नरचे टेस्टमधील पहिले तिहेरी शतक होते. वॉर्नरने या खेळीदरम्यान 37 चौकार ठोकले. वॉर्नरने गुलाबी बॉलने डे-नाईट टेस्ट सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ही कामगिरी केली.

दीपक चाहर हॅटट्रिक

बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 मॅचमध्ये दीपक चाहरने शानदार गोलंदाजी करत हॅटट्रिक नोंदवली. ही दीपकच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीची पहिली हॅटट्रिक होती. शिवाय,आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील भारताकडून ही पहिली हॅटट्रिक होती. दीपकने बांग्लादेशविरुद्ध एकूण 3.2 ओव्हर्स टाकले आणि केवळ 7 धावा देऊन 6 गडी बाद केले.

स्टिव्ह स्मिथचे दमदार टेस्ट पदार्पण

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला रोखणे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी या अ‍ॅशेस मालिकेत सोपे काम नव्हते. बॉल-टेम्परिंगच्या बंदीनंतर परतलेल्या स्मिथने इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेतून दमदार पुनरागमन केले आणि काही संस्मरणीय डाव खेळले. या मालिकेत स्मिथने 110.57 च्या सरासरीने एकूण 774 धावा ठोकल्या. पाच सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राहिल्यावर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस ट्रॉफी कायम ठेवली.

यासर्वांव्यतिरिक्त, एक दशकनंतर क्रिकेटने पाकिस्तानमध्ये पुनरागमन केले. 2009 दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी संघ जाहीर केला. शिवाय, सध्या दोंघांमध्ये 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जात आहे.