Yashasvi Jaiswal 1000 Test Runs in 2024: टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भलेही 30 धावांवर बाद झाला असेल पण त्याने एक विशेष टप्पा गाठला. 2024 मध्ये कसोटीत 1000 धावा पूर्ण करणारा यशस्वी हा दुसरा फलंदाज ठरला. या यादीत पहिल्या स्थानी जो रुट आहे. जो रुटने 14 कसोटीत 60 च्या सरासरीने 1305 धावा केल्या आहेत. या वर्षात त्याने 5 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. या वर्षी मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत रुटने सर्वाधिक 262 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये आतापर्यंत 10 कसोटीत 59.23 च्या सरासरीने आणि 76 च्या स्ट्राईक रेटने 1007 धावा केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला राजकोट कसोटीत त्याने इंग्लंडविरुद्ध 214 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली होती. याआधी त्याने विझाग कसोटीतही 209 धावांची इनिंग खेळली होती.
Yashasvi Jaiswal Shines Bright: First Indian Batter to Score 1000 Test Runs in 2024. pic.twitter.com/DVOc3rFyur
— sporty Champion (@sportychampions) October 25, 2024
जैस्वालचा कसोटी क्रिकेटचा हंगाम जबरदस्त होता हे वेगळे सांगायला नको. गेल्या वर्षी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत 171 धावांची खेळी खेळली होती. यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या बेन डकेट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 957 धावा केल्या आहेत. शुभमन गिलच्याही 9 कसोटीत 692 धावा आहेत. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडिया 156 धावांवर ऑलआऊट, मिचेल सँटनर घेतल्या 7 विकेट; न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी)
न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत यशस्वीला अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, जरी त्याने चांगली सुरुवात केली असली तरी त्याचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला आहे. या स्टार खेळाडूने बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 13 आणि 35 धावा केल्या होत्या. भारताने हा कसोटी सामना 8 विकेटने गमावला आणि मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. जैस्वाल दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीच्या डावात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण पुन्हा एकदा बाद झाला. त्याने चार चौकार मारत 60 चेंडूत 30 धावा केल्या.