ENG vs AUS, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये रिकी पॉन्टिंग याला मागे टाकत इंग्लंडच्या जो रुटने रचला विश्वचषक रेकॉर्ड
जो रुट (Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज यजमान इंग्लंड (England)आणि ऑस्ट्रेलिया (Asutralia) संघात दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 223 धावांवर रोखले. या सामन्यात भरवश्याचा फलंदाज जो रूट (Joe Root) याने पॅट कमिन्स (Pat Cummins) याचा एक झेल पकडला. हा झेल पकडत रुटने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. कारण एका विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रुटच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याच्या नावावर होता. पॉन्टिंगने 2013 साली झालेल्या विश्वचषकात 11 झेल पकडले होते. या विश्वचषकात रुटने 12 झेल पकडले आहेत. (ENG vs AUS, ICC CWC 2019 Semi-Final: इंग्लंड संघाला विजयासाठी 224 धावांचे लक्ष, स्टिव्ह स्मिथ याची एकाकी झुंज)

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघातून विजयी होणारी टीम फायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भिडेल. त्यामुळे कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे तर इंग्लंडने एकदाही हा खिताब जिंकला नाही.

दुसरीकडे, जोफ्रा आर्चरने टाकलेल्या आठव्या ओव्हरमधील चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि त्याला दुखापत झाली. चेंडूचा वेग इतका होता की केरीच्या जबड्यावरील कातडी सोलली गेली अन् रक्त वाहू लागलं. केरीला तातडीनं वैद्यकीय मदत करण्यात आली. जबड्यावर पट्टी लावून त्यानंतर केरी मैदानावर खेळत राहिला.