SA W vs PAK W World Cup 2022: क्रिकेटच्या एका षटकांत 6 चेंडूं असतात, परंतु आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 मध्ये एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण अफ्रिका (South Africa) यांच्यात नुकत्याच संपुष्टात आलेल्या विश्वचषकच्या 9 व्या सामन्या दरम्यान एका षटकांत सहा ऐवजी 7 चेंडूंचे टाकले गेले. षटकात वाइड किंवा नो बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाला अधिकचे बॉल टाकावे लागतात, पण या षटकात एकही वाईड किंवा नो बॉल पडला नव्हता तरीही पाकिस्तान संघातील गोलंदाजाने 7 चेंडू टाकले. आयसीसी (ICC) स्पर्धेसारख्या मंचावर अशी चूक झाल्यामुळे याची चर्चा रंगली आहे. हे सर्व सामन्याच्या 27 व्या षटकात घडले जेव्हा दक्षिण आफ्रिकेची सुने लुस (Sune Luus) आणि लॉरा वोल्वार्ड (Laura Wolvaardt) ही जोडी फलंदाजी करत होती.
लक्षात घ्यायचे की ओमिमा सोहेलने (Omaima Sohail) टाकलेल्या ओव्हरमध्ये एकही वाईड किंवा नो-बॉल दिला गेला नाही. तथापि ओव्हरमध्ये DRS रेफरलचा समावेश होता ज्यामुळे अंपायर बॉलची गणना करण्यास विसरले. षटकातील हा 6 वा चेंडू होता ज्यात LBW आऊट दिल्यानंतर लुसला जीवनदान मिळाले होते. नंतर, 7वा चेंडू टाकण्यात आला ज्यामध्ये लुसने एकेरी धाव घेतली. अखेरीस, सामना अटीतटीचा ठरला आणि दक्षिण आफ्रिकेने 6 धावांच्या छोट्या फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना Proteas महिला संघाने एकूण 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 49.5 षटकांत 217 धावांत आटोपला.
Legal 7 ball over… 😲 What’s happening?#PAKvSA #CWC22 pic.twitter.com/V3Y8GpF2Aq
— ಒಬ್ಬಟ್ಟು | O ₿ ₿ A T T U 🔑 (@7cr0re) March 11, 2022
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लुस हिने या सामन्यातील तिच्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि विश्वचषक स्पर्धेत मुलींनी ज्याप्रकारे अत्यंत चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन केले त्याचे कौतुक केले. क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक धाव आणि चेंडू खूप महत्वाचा असतो. एक धाव किंवा एका चेंडूमळे संघाच्या हातातोंडाला आलेला घास खाली पडू शकतो. आयसीसी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये या अशा लहान चुका संघांना महागात पडू शकतात. आणि पाकिस्तानला देखील अशीच चूक आजच्या सामन्यात भोवली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सामन्यानंतरच्या गुणतालिकेबद्दल बोलायचे तर पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत दोन विजयांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर पाकिस्तानने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे संघ पॉईंट टेबलमध्ये तळाशी कायम आहेत.