Women's T20 World Cup: स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर ने केले निराश; भारत महिला टीमने न्यूझीलंडला दिले 134 धावांचे लक्ष्य
शेफाली वर्मा (Photo Credit: IANS)

महिला टी-20 विश्वचषकात (Women's T20 World Cup) भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील ग्रुप सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे खेळला जात आहे. सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत भारताने न्यूझीलंडसमोर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 134 धावांचे लक्ष्य दिले. 16 वर्षीय शेफाली वर्माला (Shafali Verma) वगळता भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. मागील सामन्याला खराब तब्यतीमुळे मुकावे लागणाऱ्या सलामी फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 11, कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 1, जेमीमाह रॉड्रिग्ज 10 धावा केल्या. शेफाली वर्माने एकहाती डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संघासाठी सलामीवीर शेफालीने सर्वाधिक 46 धावा केल्या आणि तानिया भाटियाने 23 धावा केल्या. न्यूझीलंडने त्यांच्या गोलंदाजीची प्रभावी कामगिरी केली. रोजमेरी मेयर आणि अमेलिया केरने प्रत्येकी 2, लीग कास्पेरेक, ली ताहुहु आणि कर्णधार सोफी डिवाइन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND W vs NZ W, Women's T20 World Cup 2020 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर)

भारताचा अर्धा संघ 100 धावांच्या आतच तंबूत परतला. यंदाच्या टी-20 विश्वचषकमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीतचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. तिला तीन सामन्यांत दहाचा आकडादेखील स्पर्श करता आला नाही. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2, बांग्लादेशविरुद्ध 8 आणि आता न्यूझीलंडविरुद्ध 1 धाव केली. मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल मैदानावरील हा ग्रुप सामना जिंकून भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करू इच्छित असेल, शिवाय विजयाची हॅटट्रिक करण्यावर देखील त्यांचे लक्ष्य असेल.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कर्णधार हरमनप्रीतने रिचा घोष आणि अरुंधती रेड्डी आणि रिचा घोष यांना वगळले, तर त्यांच्या जागी स्मृती मंधाना आणि राधा यादव यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, किवी टीमने मागील सामन्यातून प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. भारतीय संघाने ग्रुपमधील पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर गट-एमध्ये 4 गुणांसह प्रथम स्थान मिळवले आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 आणि त्यानंतर बांग्लादेशला 18 धावांनी पराभूत केले. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा दुसरा सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध 7 विकेटने पराभूत करत त्यांनी गटात दुसरे स्थान मिळवले आहे.