महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 ने मोडले व्यूअरशिपचे सर्व रेकॉर्ड, महिला क्रिकेट इतिहासातील ठरली सर्वात लोकप्रिय स्पर्धा
महिला 2020 टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty)

जागतिक महिला दिनाच्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) संपन्न झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कप (World Cup) 2020 ने व्युव्हरशीपचे सर्व रेकॉर्ड तोडले. ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपची ही आवृत्ती महिला क्रिकेट (Women's Cricket) इतिहासाची सर्वात यशस्वी आवृत्ती बनली आहे. महिला विश्वचषकात इतक्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी कधीही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. 2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत महिला टी-20 विश्वचषकला 20 हुन अधिक आणि यापूर्वी झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत (2017 महिला वनडे वर्ल्ड कप) दहा पट व्यूअर्स मिळाले आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक फायनल सामना भारतातील 90 लाखहून अधिक लोकांनी पाहिलं, जो टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर्शकत्वाचा एक नवीन विक्रम आहे.

आयसीसीने नुकत्याच संपलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दर्शकांची आकडेवारी जाहीर करीत महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कार्यक्रम म्हटले आहे. "भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेला अंतिम सामना टीव्हीवर प्रेक्षकांनी पाहिला आणि दोन्ही देशातील व्यूअरशिप रेकॉर्ड मोडले. हा सामना 86,174 प्रेक्षकांच्या उपस्थितीत मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला, तर महिला क्रिकेटमध्ये सामना पाहण्यासाठी यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक कधीच आले नव्हते. अंतिम सामन्याचे फक्त थेट प्रक्षेपण 178 कोटी लोकांनी पाहिले. दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रेक्षकांच्या तुलनेत हा आकडा 59 पट अधिक आहे. केवळ अंतिम सामन्याने संपूर्ण स्पर्धेचे 35 टक्के दर्शक मिळवले.

ऑस्ट्रेलियामध्ये 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान झालेल्या या स्पर्धेत आयसीसीच्या डिजिटल चॅनेलने चांगली कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील टीव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हा सहावा सामना आहे. दुसरीकडे, भारतातील अंतिम सामना सरासरी 90.2 लाख लोकांनी पाहिला. स्पर्धेतील दुसर्‍या सर्वाधिक प्रेक्षकांच्या तुलनेत ही आकडेवारी 154 टक्के जास्त आहे. 2019 मधील पुरुष वर्ल्ड कपनंतर पाहिलेली ही सर्वात मोठी स्पर्धा आहे.