WPL 2023 Opening Ceremony: महिला प्रीमियर लीगमध्ये लागणार बाॅलिवूड तडका, क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी लावणार ठुमके
Kriti Sanon and Kiara Advani (Photo Credit - FB)

महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सत्राचा उद्घाटन सोहळा 4 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सामन्यापूर्वी रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या फंक्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार अभिनेत्री दिसणार आहेत. महिला प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) या उत्सवात रंग भरणार आहे. या दोघांशिवाय प्रसिद्ध पॉप सिंगर एपी ढिल्लन परफॉर्म करणार आहेत. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी साडे पाचला सुरु होईल.

एकूण 87 खेळाडूंना पाच फ्रँचायझींनी केले खरेदी 

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी झाला. लिलावात उतरलेल्या एकूण 448 खेळाडूंपैकी केवळ 87 खेळाडूंना बोली लागली. त्याच वेळी, पाच फ्रँचायझी, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी मिळून त्यांना खरेदी करण्यासाठी 59.50 कोटी रुपये खर्च केले. गुजरात, दिल्ली आणि बंगळुरूने सर्वाधिक 18-18 खेळाडू खरेदी केले. तर, मुंबईने 17 तर यूपीने 16 खेळाडूंना खरेदी केले. (हे देखील वाचा: Shardul Thakur Ukhana Video: शार्दुल ठाकूर याने घेतला बायकोसाठी उखाणा, पाहा व्हिडिओ)

स्मृती मानधना ठरली सर्वात महागडी खेळाडू

या लिलावात 160 हून अधिक परदेशी खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी फक्त 30 खेळाडूंना बोली लागली. त्याच वेळी, 250 हून अधिक भारतीय खेळाडूंनी लिलावात प्रवेश केला होता. त्यापैकी 57 भारतीय खेळाडू लिलावात विकले गेले. लिलावात फ्रँचायझींनी 20 खेळाडूंवर एक कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम लुटली. यापैकी चार खेळाडूंना फ्रँचायझींनी 2 कोटी ते 3 कोटी रुपयांमध्ये आणि तीन खेळाडूंना 3 कोटींहून अधिक रुपयांना खरेदी केले. स्मृती मानधना (RCB) लिलावात सर्वात महाग विकली गेली. तिला 3.40 कोटींची बोली लागली.