
Women’s ODI World Cup 2025 Tickets: क्रिकेटचा कोणताही वर्ल्ड कप असो, तो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तिकिटांसाठी मोठी गर्दी होते. चाहते कोणत्याही किंमतीत तिकीट मिळवू इच्छितात, पण 30 सप्टेंबर पासून भारत आणि श्रीलंकेत सुरू होणाऱ्या महिला विश्वचषक 2025 साठी फक्त 100 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ही माहिती दिली आहे. एवढ्या स्वस्त दरात तिकीट कधी आणि कुठे बुक करायचे, हे जाणून घेऊया.
4 दिवसांची 'प्री-सेल'
30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 साठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. आयसीसीने 4 सप्टेंबरपासून चार दिवसांसाठी 'प्री-सेल' सुरू केली आहे. ही विंडो नियमित तिकीट विक्रीपूर्वी एक विशेष संधी म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Asia Cup च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत फक्त एका भारतीयाचा समावेश
'गुगल-पे' ग्राहकांना संधी
आयसीसीने स्पष्ट केले आहे की, ही 'प्री-सेल' सर्वांसाठी नाही. ती फक्त 'गुगल-पे' (Google Pay) ग्राहकांसाठी आहे. या ग्राहकांना तिकीट खरेदीवर 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. तिकिटाची किंमतही 100 रुपयेच ठेवण्यात आली आहे. ही 'प्री-सेल' संपल्यानंतर 9 सप्टेंबरपासून तिकिटांच्या विक्रीचा दुसरा टप्पा सुरू होईल, जो सर्व चाहत्यांसाठी असेल. 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून तिकीट विक्री सुरू होईल.
तिकीट कुठे बुक कराल?
महिला विश्वचषक 2025 चे तिकीट Tickets.cricketworldcup.com या लिंकवर जाऊन खरेदी करता येतील. आयसीसीला सामन्यांदरम्यान स्टेडियम भरलेले असावेत, अशी इच्छा असल्यामुळे तिकिटाची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.
श्रेय घोषाल करणार 'परफॉर्म'
महिला वनडे विश्वचषक 2025 चा उद्घाटन सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीमध्ये यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) परफॉर्म करणार आहे. तिनेच या विश्वचषकाचे अधिकृत थीम साँग गायले आहे, जे लवकरच रिलीज केले जाईल.
स्पर्धेचे स्वरूप
महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. 30 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा 3 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या विश्वचषकातील बहुतेक सामने भारतात होणार आहेत, तर पाकिस्तानचा संघ आपले सामने श्रीलंकेमध्ये खेळेल. जर पाकिस्तानचा संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला, तर सेमीफायनल आणि फायनलचे सामने भारतात होतील. पण जर तो फायनलमध्ये पोहोचला, तर अंतिम सामना श्रीलंकेत खेळला जाऊ शकतो. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.