Jasprit Bumrah, Sanjana Ganesan (Photo Credits: Instagram/Jasprit Bumrah, Sanjana Ganesan)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार बुमराह स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनसह (Sanjana Ganesan) सप्तपदी चालणार आहे. बुमराह 14 किंवा 15 मार्च रोजी गोव्यात संजनाशी लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. बुमराहने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून आपले नाव मागे घेतले आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजच्या लग्नाची चर्चा वाढली. यापूर्वी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमचे नाव क्रिकेटर जसप्रीत बुमराहशी जोडले गेले होते.

आता जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. जर या बातमीवर विश्वास ठेवला तर जसप्रीत बुमराह या आठवड्यातच लग्न करणार आहे. यामुळे टीम इंडियामधून सुट्टी घेण्याचे ‘लग्न’ हेच कारण असावे असे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर बुमराह गोव्यात लग्न करणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मात्र याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

कोण आहे संजना गणेशन?

संजना गणेशनबद्दल बोलायचे झाले तर, ती साधारण 28 वर्षांची आहे आणि तिचा जन्म पुण्यात झाला आहे. संजनाने पुणे विद्यापीठातूनच अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्यानंतर ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनलमध्येही पोहोचली होती. याआधी, गणेशनने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचा किताब जिंकला आहे. यासह तिने एमटीव्हीचा रिअॅलिटी शो स्पिलिट्स व्हिलाद्वारे टीव्हीवर डेब्यू केला होता. आता संजना गणेशन क्रिकेट चाहत्यांना क्रीडा अँकर म्हणून परिचित आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 दरम्यान ती टीव्हीवर बरीच दिसली होती.