फवाद आलम (Photo Credit: Facebook)

WI vs PAK 2nd Test Day 3: पाकिस्तानचा (Pakistan) 35 वर्षीय स्टार फलंदाज फवाद आलमने (Fawad Alam) रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मालिकेच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नाबाद 124 धावांची खेळी करून इतिहास रचला. फवादने कारकिर्दीच्या 13 व्या कसोटीतील 22 व्या डावाचे शतकात रूपांतर केले आणि सर्वात कमी कसोटी डावात पाच शतके करणारा आशियाई (Asian) फलंदाज बनला आहे. या कामगिरीची नोंद करत त्याने चार भारतीय (India) फलंदाजांना ओव्हरटेक करत यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फवाद 213 चेंडूत नाबाद 124 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याच्या शानदार शतकाच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने कॅरेबियन संघाविरुद्ध पहिल्या डावात 302 धावांचा डोंगर उभारला. फवादने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे कसोटी शतक 186 चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने 17 चौकार खेचले. (WI vs PAK 2nd Test: पाकिस्तानचा डाव 302/9 धावांवर घोषित, फवाद आलमचे शानदार शतक; दिवसाखेर विंडीजच्या 39 धावा 3 बाद)

फवाद जेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी आला तेव्हा पाकिस्तानी संघाने अवघ्या दोन धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर, त्याने कर्णधार बाबर आझमसह चौथा विकेट शतकी भागीदारी करत संघाची नौका पार लगावली. फवाद फलंदाजी करताना जखमी होऊन रिटायर्ड हर्ट झाला होता तरी जेव्हा तो मैदानावर परतला, तेव्हा त्याने आपले शतक पूर्ण करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. फवाद आलमने 22 डावांमध्ये चेतेश्वर पुजाराच्या सर्वात वेगवान पाच कसोटी शतक झळकावण्याचा आशियाई विक्रम मोडीत काढलं. पुजाराने 24 कसोटी डावांमध्ये पाच कसोटी शतके केली होती. दुसरीकडे, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांनी प्रत्येकी 25 आणि विजय हजारे यांनी 26 कसोटी डावात हा कारनामा केला होता.

दरम्यान 2009 मध्ये कसोटी पदार्पणानंतर 10 वर्षे कोणीही फवाद आलमकडे पाकिस्तानी बोर्डाने वळूनही पहिले नव्हते. तथापि तब्बल 11 वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध साऊथम्प्टन येथे 2020 कसोटी सामन्यातून तो पाकिस्तानी टेस्ट संघात परतला. एका दशकापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्यावर त्याने पुनरागमन केल्यापासून त्याने गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये चार शतके केली आहेत. त्याने वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि न्यूझीलंड येथे अशा वेगळ्या संघाविरुद्ध ही सर्व शतके केली आहेत.