क्रिस गेल (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs AUS 3rd T20I: ‘युनिव्हर्स बॉस’ अशी ख्याती मिळवलेला वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलिया  (Australia) विरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात 41 वर्षीय गेलने आणखी एक चित्तथरारक टप्पा गाठला. युनिव्हर्स बॉस एकट्या टी-20 क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा पल्ला सर करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात गेलची शांत बॅट होती. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये गेलला वेस्ट इंडिजकडून अनुक्रमे 4 आणि 13 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली पण गेलने पुन्हा दाखवून दिले की तो अद्यापही खेळाच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. अ‍ॅडम झांपाच्या डावातील 20व्या ओव्हरमध्ये षटकार खेचत गेलने विक्रमी टप्पा गाठला. (SA vs WI T20I 2021: पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर Chris Gayle चे हटके सेलिब्रेशन झाले व्हायरल)

दरम्यान, या सामन्याच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये त्याने जोश हेझलवुडची धुलाई केली दुसर्‍या षटकातील शेवटच्या चार चेंडूंमध्ये त्याने 18 धावा काढल्या. गेलने शेवटचे चार चेंडू 6, 4, 4, 4 धावांची सीमारेषा पार पोहचवले. त्यानंतर गेलने झांपाच्या षटकात सलग तीन षटकार मारत 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे पहिले अर्धशतक असून त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. गेलने आपल्या आताशी डावात 38 चेंडूत 67 धावा केल्या. या दरम्यान त्याने केवळ चौकार आणि षटकारांसह 58 धावा जोडल्या. गेलने आपल्या स्फोटक डावात 4 चौकार आणि 7 षटकार लगावले. तसेच आता 430 टी-20 सामन्यात त्याच्या नावावर एकूण 14 हजार 38 धावांची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 175 नाबाद असून त्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध हा कारनामा केला होता.

दुसरीकडे, गेलच्या पाठोपाठ टी-20 क्रिकेटच्या या एलिट यादीत त्याचा सहकारी किरोन पोलार्ड असून त्याच्या नावावर 10,836 धावा आहेत.पाकिस्तानचा शोएब मलिक देखील पोलार्डच्या अधिक मागे नसून त्याने 425 सामन्यात 1074 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर 304 सामन्यात 10,017 धावा आणि भारताचा विराट कोहली 310 सामन्यात 9992 धावा करून टॉप-5 मध्ये सामील आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे तर कांगारू संघाने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विंडीजने 14.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.