स्टीव्ह स्मिथ च्या Ashes मधील जबरदस्त फॉर्मवर सचिन तेंडुलकर ने केले रिसर्च, 3 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये केला उलगडा (Video)
Steve Smith (Twitter)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या अ‍ॅशेस (Ashes) मालिका 2-2 ने ड्रॉ झाली. मालिकेतिल एक सामना अनिर्णित राहिला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने अपवादात्मक कामगिरी करून चार कसोटी सामन्यांच्या सात डावात 774 धावा केल्या. यामध्ये दोन शतक, एक दुहेरी शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. स्मिथची कामगिरी खास आहे कारण बॉल टॅम्परिंगच्या (Ball-Tampering) आरोपावरील एक वर्षाच्या बंदीनंतर तो अ‍ॅशेसद्वारे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत होता. अ‍ॅशेस मालिकेनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपापल्या मार्गाने स्मिथच्या यशाचे रहस्य उघड केले. आता भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने स्मिथच्या फलंदाजीच्या तंत्रावर संशोधन करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याने सुनील गावस्कर यांच्या 49 वर्ष जुन्या रेकॉर्डची केली बरोबरी, वाचा सविस्तर)

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये स्मिथने कसे धावांचा डोंगर उभा केला हे सचिनने 2 मिनिट 51 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. स्टीव्ह स्मिथ त्याच्या प्रतिस्पर्धी संघांवर कसा भारी पडायचा हे सचिनने सांगितले आहे. सचिनने दीड महिने चाललेल्या अ‍ॅशेस मालिकेचे विशेष विश्लेषण केले. लॉर्ड्समधील दुसर्‍या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चर याच्या बाऊन्सरवर दुखापत झाल्यानंतर स्मिथने आपल्या तंत्रात कसे बदल केले ते त्यांनी सांगितले. स्मिथच्या डाव्या पायाचे विश्लेषण करताना सचिनने त्याच्या यशासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे. पहा हा व्हिडिओ:

दरम्यान, स्मिथचे बालपणचे प्रशिक्षक ट्रेंट वुडहिल यांनी नुकतेच स्मिथचे कौतुक केले आणि दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन नंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचे वर्णन केले. विचित्र फलंदाजी करूनही या मालिकेत स्मिथ अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा अत्यंत यशस्वी राहिला. त्याने इंग्लिश गोलंदाजांना स्वतःच्या प्रमाणे गोलंदाजी करायला भाग पाडले. अ‍ॅशेस मालिकेमध्ये स्मिथने जबरदस्त यश संपादन केले आणि याच्या जोरावर त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली याला मागे टाकत अव्वल स्थान गाठले.