एम एस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग (Photo Credits: File Photo)

विश्वचषकमधील पराभवानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले आहे. विश्वकपमधील भारताचा अंतिम सामना हा धोनीच्या करिअरमधील अंतिम सामना असल्याचे बोलले जात होते. पण अद्याप धोनीकडून यावर कोणतेही भाष्य केले नाही. यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनी प्रभावी खेळी करण्यास अयशस्वी राहिला आणि त्याच्या संथ खेळीची सर्वत्र टीका सुद्धा केली गेली. धोनीच्या स्लो खेळीमुळे भारतीय संघ (Indian Team) जिंकणारे सामने देखील गमावून बसला. त्यामुळे विशषज्ञ आणि चाहत्यांकडून त्याच्या निवृत्तीची मागणी केली जात आहे. पण धोनीने कधी निवृत्ती घ्यावी याचा पूर्ण अधिकार त्याचा आहे असे ठाम मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने मांडले आहे. (टी-20 विश्वचषक 2020 नंतर महेंद्र सिंह धोनी ने निवृत्ती घ्यावी, 'कॅप्टन कूल' च्या सेवानिवृत्तीवर बालपण प्रशिक्षकाचे मत)

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक मध्ये धोनीच्या खेळावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, सेहवागने एका इंग्लिश न्यूज चॅनेलशी बोलताना निवड समितीकडे अपील केले की त्यांनी धोनीशी चर्चा करावी आणि त्याला स्पष्टपणे सांगावं की, ते आता त्याला पुढे संधी देऊ शकत नाही. शिवाय सेहवाग आपल्या निवृत्तीबाबत खुलासा करत म्हणाला, "जर निवड समितीने तेव्हा मला माझ्या रणनितीबाबत विचारलं असतं, तर कदाचित मी त्यांना सांगू शकलो असतो," असे म्हणत सेहवागने माजी निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यावर निशाणा साधला. सेहवागने निवृत्ती घेतली, तेव्हा पाटील निवड समितीचे अध्यक्ष होते.

दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीप्रमाणे टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यासाठी धोनीची निवड होणे कठीण आहे. धोनी आता भारतामधील किंवा अवे सामन्यांमध्ये विकेटकीपर म्हणून भारताची पहिली पसंद नसणार आहे. त्याची जागा रिषभ पंत ला देण्यात येईल.