Sachin Tendulkar कडून धडा घेणार Virat Kohli? ऑफ-साइड बॉलवर आउट होत होते मास्टर-ब्लास्टर, ‘या’ बदलानंतर झळकावले द्विशतक
सचिन तेंडुलकर, विराट कोहली (Photo Credit: Getty)

टीम इंडियाची (Team India) मधली फळी गेल्या काही काळापासून फॉर्मशी संबंधित समस्यांशी झुंज देत आहे. यापैकी भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात त्रासदायक गोष्ट बनली आहे. कोहलीने गेल्या 21 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावले नाही. तसेच इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात त्याची बॅट सतत शांत आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फक्त 7 धावा करून कोहली विकेटच्या मागे झेलबाद झाला, तर पहिल्या तीन डावांमध्येही कव्हरवर खेळताना ऑफ साइड चेंडू, स्लिप किंवा विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट होऊन माघारी परतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट सध्या ज्या समस्येला सामोरे जात आहे, 2003-04 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील याच समस्येने त्रस्त झाला होता. सचिन त्या काळात कव्हरमध्ये ऑफ साईड बॉल खेळण्याचा सतत प्रयत्न करत होता. (IND vs ENG 3rd Test: ‘अहंकार खिशात ठेवा’! विराट कोहलीच्या सतत फ्लॉप-शोवर संतापला भारतीय दिग्गज, देऊन टाकला ‘हा’ सल्ला)

यानंतर ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंनी तेंडुलकरची ही कमजोरी ताबडतोब पकडली आणि त्याला ऑफ साईडवर चेंडू टाकण्यास सुरुवात केली. तिसऱ्या कसोटीपर्यंत सचिनला पाय बाहेर काढणे भाग पडले आणि कव्हर ड्राईव्ह खेळला. वेगवान चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून थेट विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्टच्या हातात गेला. दोन्ही डावांमध्ये सचिन विकेटच्या मागे झेलबाद झाला. तीनही सामन्यांमध्ये त्याने फक्त 88 धावा काढल्या. तसेच पाच डावांमध्ये तो दोनदा शून्यावर बाद झाला. अशास्थितीत, पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे आऊट होत असल्यामुळे सचिनने त्याच्या तंत्रात मोठा बदल केला आणि पुढच्याच सामन्यात द्विशतक झळकावले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी अलीकडेच विराटला तो इंग्लंडविरुद्ध करत असलेल्या चुकीवर मात करण्यासाठी सचिनच्या 2003-04 च्या तंत्राची मदत घेण्याचा सल्ला दिला. सचिननेही अलीकडेच एका टीव्ही मुलाखतीत त्याच्या विकेटच्या मागे बाहेर आऊट होण्यापासून टाळण्याच्या तंत्राचा उल्लेख केला होता. त्याने सांगितले की 2003 मध्ये सिडनी मैदानावर, त्याने मैदानात प्रवेश करताच निर्णय घेतला होता की, डावामध्ये ऑफ-साईडच्या दिशेने येणाऱ्या चेंडूंवर तो कव्हर ड्राइव्ह मारणार नाही.

तेंडुलकर म्हणाला- “जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आऊट झालो तेव्हा माझ्या भावाशी बोललो, तो म्हणाला की तुझ्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमजोरी नाही, फक्त शॉट निवडीमध्ये समस्या आहे.” सचिनच्या मते, या सल्ल्याचे पालन करत त्याने गोलंदाजांविरुद्ध भूमिका घेण्यासाठी शिस्तीचा वापर केला. कसोटी सामन्यात सचिनला त्याच्या भावाने नाबाद राहण्याचे आव्हान दिले होते आणि त्यानंतर सचिनने आऊट होऊ नये म्हणून कव्हर ड्राइव्ह खेळली नाही. त्याच्या 241 धावांच्या शानदार खेळीत सचिनने 436 चेंडूंचा सामना केला.