विराट कोहली (Image: PTI/File)

Virat Kohli Completes 9000 Runs in T20 Cricket: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीत 9 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल अव्वल स्थानी आहे. यानंतर कायरन पोलार्ड, शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्युलम, डेविड वार्नर, ऍरोन फिंच यांचा क्रमांक लागतो. आता या यादीत विराट कोहलीचाही समावेश झाला आहे. या कामगिरीमुळे संपूर्ण क्रिडाविश्वातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

विराट कोहलीने आपला पहिला टी-20 सामना 2007 मध्ये खेळला होता. विराटने आतापर्यंत 285 टी-20 क्रिकेट सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आरसीबीकडून 5926 धावा केल्या आहेत. तर, भारतीय संघाकडून खेळताना त्याने 2 हजार 794 धावा केल्या आहेत. यामुळे 9 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 10 धावांची गरज होती. दिल्ली विरुद्ध सुरु असलेल्या आजच्या सामन्यात त्याने 10 धावा पूर्ण केल्या आहेत. हे देखील वाचा- RCB Vs DC, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

टी-20 कारकिर्दीमध्ये क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. युनिव्हर्स बॉस क्रिस गेलने 404 सामन्यात 13 हजार 296 केल्या आहेत. या यादीत 10 हजार धावा करणारा कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर शोएब मलिक (9926), ब्रेंडन मॅक्युलम (9922), डेव्हिड वार्नर (9452), ऍरोन फिंच (9148) यांचा क्रमांक लागतो. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीचाही या यादीत समावेश झाला आहे.

विराट कोहलीनंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने 333 टी-20 सामने खेळले असून 8818 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 9 हजारांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 182 धावा दूर आहे. यामुळे याच आयपीएलमध्ये आपल्या कारकिर्दीतील 9 हजार धावांचा टप्पा गाठू शकतो.