ICC Test Rankings: न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहली ने गमावले गुण; जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा यांना झाला फायदा
(Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंडविरुद्ध खराब कामगिरीचा परिणाम भारतीय संघाच्या (Indian Team) खेळाडूंना सहन करावा लागला आहे. न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) मधील टेस्ट मालिकेनंतर आयसीसीने नवीन टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) नुकसान झाले आहे. किवीविरूद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी कोहली कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज होता, पण या मालिकेत धावा केल्या नाही. यामुळे त्याला 20 गुणाचं नुकसान झालं आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत 886 गुणांसह ते दुसर्‍या स्थानावर आहेत, तर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) 911 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कोहलीने दोन सामन्यांच्या मालिकेत फक्त 38 धावा केल्या होत्या. क्राइस्टचर्च कसोटीत चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) अर्धशतक झळकावले होते, ज्यामुळे त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. पुजाराला दोन स्थानाचा फायदा झाला असून त्याने 7 वे स्थान मिळवले आहे. मात्र, न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन ला क्रमवारीत एका स्थानाचं नुकसान झालं आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत किवी कर्णधार विल्यमसन तिसर्‍या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 8 व्या स्थानावरुन 9 व्या स्थानी घसरला आहे. टेस्ट सलामी फलंदाज मयंक अग्रवालही पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स दहाव्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज आहे. बाबर आझम आणि डेविड वॉर्नर अनुक्रमे 5 व्या आणि 6 व्या स्थानावर कायम आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही एका स्थानचे नुकसान झाले आहे आणि तो 8 व्या स्थानावर पोहचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या तीन स्थानावर कोणताही बदल झाला नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स चे पहिले स्थान कायम आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टॉप-10 मध्ये धडक मारली. बुमराहने 11 व्या स्थानावरून झेप घेत 7 वे स्थान मिळवले. ट्रेंट बोल्टही टॉप-10 मध्ये सामील झाला आहे, तर टिम साऊथीने (Tim Southee) दोन स्थानांची झेप घेतली आणि तो सहाव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

संघाच्या क्रमवारीत मालिका गमावल्यामुळे भारताने चार गुण गमावले आणि आता ते 116 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाला जबरदस्त फायदा झाला असून 110 गुणांसह त्यांनी दुसरे स्थान मिळवले आहे.