विराट कोहली (Image: PTI/File)

विशाखापट्टनममध्ये वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 10000 धावांचा टप्पा पूर्ण करत सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा विराटने गाठला आहे. कोहलीने हा रेकॉर्ड 205 डावांमध्ये पूर्ण केला. यापूर्वी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने 259 डावात 10000 धावा करत आपल्या नावे केला होता. विराट कोहलीच्या 10000 धावांनंतर अनुष्काने असा व्यक्त केला आनंद

यानंतर विराटवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. पण यावर खुद्द विराटने प्रतिक्रीया दिली आहे. तो म्हणाला की, "देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 वर्ष खेळल्यानंतरही मी कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी स्वतःला हक्कदार मानत नाही. पण मला खूप छान वाटत आहे. मला कधी वाटलं नव्हतं की, माझ्या आयुष्यात असाही क्षण येईल. पण तो आलायं. आणि त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानतो."

त्याचबरोबर कोहली पुढे म्हणाला की, "जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही तिच्या कठोर परिश्रम घ्यायला हवेत. कोणतीच गोष्ट गृहीत धरु नका. धावांची भूक तुमच्यात असायला हवी. कोणत्याही क्षणी स्वतःला संतुष्ट मानू नका." तसंच तो म्हणाला की, "मी देशासाठी खेळून कोणावरही उपकार करत नाही. ते माझे कर्तव्य आहे."