विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli in 2020: 2020 हे आतापर्यंतचे सर्वात विचित्र वर्ष राहिले आहे. अनेकांसाठी हे वर्ष अनलकी ठरले असून भारतीय पुरुष संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील याला राहिला अपवाद नाही. कोरोना व्हायरसने जगभरात विनाश घडवून आणला, सर्व काही ठप्प झाले ज्यामुळे क्रीडा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला. कॅलेंडर वर्षाच्या काळात संपूर्ण विचित्र गोष्टी घडत असताना महामारीचा फटका भारतीय कर्णधार कोहलीलाही बसला आणि त्याच्या शतकी खेळीवरही ‘लॉकडाऊन’ लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) यंदाचा आपला अंतिम सामना खेळलेला विराट संपूर्ण वर्षात तीनही फॉरमॅटमध्ये एकही शतक करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताच्या लज्जास्पद पराभवावेळी कोहली केवळ 4 धावा करून परतला आणि त्याची शतकाची पाटी यंदा कोरीच राहिली. विराटने एकूण 392 दिवसांपूर्वी बांग्लादेशविरुद्ध पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय शतक केले होते. (Virat Kohli Centuries in 2020: कमालच! 2020 मध्ये विराट कोहलीची बॅट शांत, यंदा नाही ठोकू शकला एकही आंतरराष्ट्रीय शतक)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहली दोनदा शतकाच्या जवळ पोहचला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटने सर्वाधिक 89 धावा केल्या. टी-20 मध्ये विराटची सर्वाधिक धावसंख्या 85 आणि टेस्टमध्ये 74 होती. पिंक-बॉल कसोटीच्या पहिल्या डावात तरी विराट आपल्या शतकांचा दुष्काळ संपवेल असे दिसत होते, मात्र अजिंक्य रहाणे याच्यासोबत धाव घेण्याच्या गोंधळात कोहली रनआऊट होऊन माघारी परतला, ज्यामुळे त्याची शतकांची प्रतीक्षा आणखी वाढली. अशाप्रकारे, कोहली यंदा शतकच नाही तर 90 धावांचा टप्पादेखील पार करू शकला नाही. यंदा विराटने 22 सामन्यांच्या 24 डावात एकूण 842 धावा केल्या ज्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

याशिवाय, युएई येथे आयोजित केलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामात देखील विराट बॅट आणि आपल्या नेतृत्वाने प्रभावी कामगिरी करू शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधाराने 15 सामन्यात 466 धावा केल्या, मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोक्याच्या क्षणी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. विराटने संपूर्ण स्पर्धेत 3 अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटच्या टीम इंडियाची सलग सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याची मालिकाही संपुष्टात आली. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 आणि न्यूझीलंड दौऱ्यावर 5 सामान्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप करत सलग आठ सामने जिंकले त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिले दोन सामने जिंकत विजयी विजयीरथ कायम ठेवत सलग 10 सामने जिंकले, मात्र अंतिम सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले ज्याने त्यांची विजयी मालिका रोखली. दरम्यान, विराट सध्या पॅटर्निटी रजेवर असून फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेद्वारे मैदानावर परतेल.