लाखो-करोडो फॉलोअर्स असलेला विराट कोहली ट्विटरवर या '5' परदेशी क्रिकेटर्संना करतो फॉलो!
Virat Kohli (Photo Credits: Facebook)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) अलिकडेच विराटला सन्मानित केले. गेल्यावर्षी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली अव्वल खेळाडू ठरला होता. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात 10,000 हुन अधिक तर कसोटी क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा केल्या आहेत. World Cup 2019 च्या संघात 'या' दोन खेळाडूंना एकत्र संधी दिल्यास विजय भारताच्या पथ्यावर!

कोहलीचा दमदार खेळ, हटके स्टाईल यामुळे जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. तर ट्विटरवर त्याचे सुमारे 27.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कर्णधार कोहली देखील ट्विटरवर 52 लोकांना फॉलो करतो. त्यात फक्त 5 परदेशी क्रिकेटर्सचा समावेश आहे. तर जाणून घेऊया कोण आहेत हे क्रिकेटर्स...

मार्क बाऊचर

भारताचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेचा माजी खेळाडू मार्क बाऊचर (Mark Boucher) याला ट्विटरवर फॉलो करतो. मार्क बाऊचर हा साऊथ आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि विकेटकिपर होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड मार्कच्या नावावर आहे. मार्क आता पर्यंत 147 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 5 शतकांसहीत 5515 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला 295 सामने पाहण्याची संधी मिळाली. यात त्याने 4686 धावा केल्या. मार्क बाऊचरने कसोटी सामन्यात 532 कॅच आणि एकदिवसीय सामन्यात 403 कॅचेस घेतल्या आहेत.

एबी डिव्हिलियर्स

विराटच्या फॉलो लिस्टमध्ये या फलंदाजाचेही नाव आहे. एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers) संपूर्ण जगाला त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे परिचित आहे. साऊथ आफ्रिकेसाटी 114 कसोटी सामने खेळलेल्या डिव्हिलियर्सने 22 शतकांसह 8765 धावा केल्या आहेत. 228 एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने 25 शतकांसह एकूण 9577 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर बँगलोर या टीममधून खेळतो. विराट आणि डिव्हिलियर्स खूप चांगले मित्र आहेत.

केवीन पीटरसन

विराट कोहली ट्विटरवर परदेशी क्रिकेटर केवीन पीटरसनला (Kevin Pietersen) देखील फॉलो करतो. इंग्लंडच्या या खेळाडूने 136 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 9 शतकांसह 4440 धावा केल्या आहेत. तर 104 कसोटी सामन्यात 23 शतकांसह त्याने 8181 धावा केल्या आहेत.

रॉस टेलर

न्युझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) देखील कर्णधार विराट कोहली ट्विटरवर फॉलो करतो. रॉस टेलर न्युझीलंडसाठी 90 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 17 शतकांसह 6524 धावा केल्या आहेत. तर 210 एकदिवसीय सामन्यात त्याने 20 शतकांसह 7709 धावा केल्या आहेत.

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नला (Shane Warne) देखील विराट ट्विटरवर फॉलो करतो. शेन वार्नने ऑस्ट्रेलिया संघासाठी 145 सामने खेळला असून त्यात त्याने 708 विकेट्स घेतल्या आहेत. 194 एकदिवसीय सामन्यात त्याने 293 विकेट्स घेतल्या आहेत.

यंदाच्या वर्ल्ड एलेव्हन वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून ICC ने विराट कोहलीचे नाव घोषित केले आहे. या टीममध्ये विराटसह इतर चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.