मागील महिन्यात संपुष्टात आलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमधील न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या पराभवानंतर भारतीय संघात वाद-विवादाचे चर्चा सत्र सुरु झाले. विश्वचषकमधील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाण्याआधी कोहलीने या सगळ्या अफवा असल्याचे मत व्यक्त केले होते. संघात असे काही नसून टीम इंडियाला अव्वल स्थानावर नेणे हे सगळ्यांचे ध्येय असल्याचे विराटने सांगितले होते. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दोघांमधील वाद कधीच संपणार नाही असे म्हटले आहे. (IND vs WI 1st ODI 2019: मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये दिसला विराट कोहली, कॅरेबियन गाण्यावर असा केला डान्स, पहा Video)
गावस्कर यांनी स्पोर्ट्स स्टारमध्ये लिहिलेल्या लेखात यासंबंधी लिहिले केले आहे. गावसकर यांनी म्हटले की, “रोहित आणि विराट यांनी आपल्यात सगळं ठिक आहे, असा कांगावा केला तरी परिस्थिती बदलणार नाही. जेव्हा जेव्हा रोहित आऊट होईल, तेव्हा तेव्हा तो मुद्दाम बाद झाला असेच म्हटले जाईल. कोणी अस म्हणणार नाही की, तो फेल झाला तर संघातून त्याला बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे मुद्दाम आऊट होऊन तो स्वत:च्याच अडचणी वाढवत आहे, याचा विचार कोणी करणार नाही.” शिवाय या सगळ्या अफवांमुळे संघातील वातावरण खराब होते. खेळाडूंना त्याचा त्रास होते”, असेही त्यांनी म्हणाले.
गावस्कर यांनी आपल्या लेखात पुढे लिहिले की, 'माध्यमांसाठी अशा कथा स्वर्गांसारख्या असतात, क्रिकेट चालू असताना अशा कथा शांत होतात आणि इतर दिवसांत पुन्हा अशा बातम्या येऊ लागतात. विराट आणि रोहित प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत, दोघे मैदानावर येतील आणि टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी खेळतील, पण अशा कथा 20 वर्षानंतरही चालू राहतील.