विराट कोहली (Photo Credit: @parthgoradia13/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ टी-20 मालिकेनंतर आता वनडे मालिकेत आमने-सामने आले आहेत. दोन्ही संघातील पहिल्या वनडे मॅचमध्ये पावसाने दोनदा व्यत्यय घातला. सुरुवातीला पावसामुळे टॉसला उशीर झाला. त्यामुळे दोन्ही संघात 43 ओव्हरचा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. आणि सामना सुरु झाल्यावर 2 ओव्हर होताच पुन्हा पावसाने खेळात खोडा घातला. भारतीय संघ आणि विंडीजमधील पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याला जरी पावसामुळे उशीर झाला असला तरी भारतीय कर्णधार कोहली कूल मूडमध्ये दिसला. (दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती)

पहिल्या वनडे सामन्यात दुसऱ्यांदा पावसाने व्यत्यय घातल्यावर जेव्हा सर्व टीम इंडिया खेळाडू मैदानावर परतले, तेव्हा कोहली कॅरेबियन गाण्यावर थिरकताना दिसला. विंडीजमधील गाण्याचा आनंद घेत कोहली अन्य खेळाडूंसह डान्स करताना दिसला. कोहली ख्रिस गेल आणि केदार जाधव यांच्यासोबत भांगडा करताना दिसला. खेळाडूंशिवाय कोहली तिथे उपस्थित असलेल्या ग्राऊंड कर्मचार्‍यांसह नाचताना दिसला. दरम्यान, याआधी देखील पहिल्या टी-20 सामन्यात कोहली मैदानावरच डान्स करायला लागला.

दुसरीकडे, विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत विराटला रेकॉर्ड खेळी करण्याची संधी आहे. पहिल्या वनडे सामन्यात 19 धावा करताच कोहली एक नवीन विक्रमाची नोंद करेल. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांच्या नावावर आहे. पण, कोहलीला तो विक्रम मोडण्याची संधी आहे. मियाँदादने 64 सामन्यांत 33.85 च्या सरासरीनं 1930 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, कोहलीने 33 डावांत 70.81 च्या सरासरीने 1912 धावा केल्या आहेत. विंडीजविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने विंडीजविरुद्ध 7 शतकं केली आहेत. शिवाय वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत माजी कर्णधार सौरव गांगुली याचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला 78 धावांची गरज आहे.