माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या खाजगी रूग्णालयात दाखल आहे. आयसीयू मध्ये दाखल असलेल्या विनोद कांबळीच्या मेडिकल टेस्ट मध्ये त्याच्या मेंदूमध्ये गाठी असल्याचं निदान डॉक्टरांनी केले आहे. डॉ. विवेक त्रिवेदी त्याच्यावर उपचार करत आहेत. विनोदला आधी युरिनरी इंफेक्शन आणि क्रॅम्सचा त्रास जाणवत होता. त्यानंतर हॉस्पिटल मध्ये विनोदला दाखल करण्यात आले आहे.
ठाण्याच्या आकृती हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या विनोद वर काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटल इन चार्ज एस सिंग यांनी विनोद कांबळीला लाईफटाईम साठी मोफत आरोग्य सुविधा देण्याचे जाहीर केले आहे.
52 वर्षीय विनोद कांबळी काही दिवसांपूर्वी दादर च्या शिवाजी पार्क परिसरात उभारलेल्या रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिस्थळाच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित होता. त्यावेळी नीट चालता-बोलता येत नसलेल्या विनोदला पाहून अनेक जण हळहळले होते. दरम्यान स्टेजवर सचिन आणि विनोदची भेट झाल्याचाही व्हिडिओ वायरल झाला होता. त्यानंतर अजय जडेजा ने त्याची भेट घेतली होती. तर सुनील गावस्कर, कपिल देव यांनी विनोद कांबळीवर उपचारांसाठी मदतीची तयारी दाखवली आहे. (हेही वाचा - Vinod Kambli Health: 'पुनर्वसन केंद्रात जायला तयार', विनोद कांबळी यांनी उलघडला प्रवास; सचिन तेंडूलकर, अजय जडेजा यांच्याबद्दलही सागितल्या आठवणी).
विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल आकृती हॉस्पिटल कडून आता चिंता वाढवणारी अपडेट जारी करण्यात आली असली तरीही आयसीयू मध्ये असलेल्या विनोद कांबळीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी विनोदला दोन हार्ट अटॅक येऊन गेले आहेत.