Vijay Hazare Trophy 2021: विजय हजारे ट्रॉफी (VIjay Hazare Trophy) स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात कर्णधार पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वात मुंबई (Mumbai) संघाने 72 धावांनी कर्नाटक )Karnataka) संघाविरुद्ध दमदार विजय मिळवला. यासह मुंबई टीमने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला जिथे त्यांचा सामना आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) संघाशी होईल. कर्णधार शॉच्या चमकदार 165 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 322 धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वीने 122 चेंडूत 165 धावांची खेळी केली तर शम्स मुलानीने 45, शिवम दुबेने 27 आणि अमन हकीम खानने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरात देवदत्त पडिक्क्लने (Devdutt Padikkal) 64 धावांची जोरदार खेळी केली, पण त्याला योग्य साथ न मिळाल्याने अखेर मुंबईने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. मनीष पांडे पॅव्हिलियनमध्ये परतला, तर करुण नायर चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. बीआर शरथने शानदार डाव खेळला असला कर्नाटकला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा नव्हता. मुंबईकडून तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी, तनुष कोटियन आणि मुलानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर धवल कुलकर्णी आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेण्यात यश आलं. (Vijay Hazare Trophy स्पर्धेत पृथ्वी शॉ याचा दबदबा, 79 चेंडूत शतक ठोकत तोडला मयंक अग्रवालचा रेकॉर्ड)
मुंबईने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकची सुरूवात खराब झाली. कर्णधार रवीकुमार समर्थ स्वस्तात आऊट माघारी परतला, पण यंदा हंगामात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या पडिक्कलने 64 धावा केल्या. कर्नाटक संघाला मुंबईने नियमित अंतराने धक्के देत दबाव कायम ठेवला. शरथने 61 धावांची खेळी केली, तर नायरने 29, श्रेयस गोपाळने 33 आणि कृष्णप्पा गौतमने 28 धावा केल्या. विशेष म्हणजे, यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचा हा सलग सातवा विजय ठरला. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने दिल्लीचा 7 विकेटने, महाराष्ट्राचा 6 विकेटने, पुदुच्चेरीचा 233 धावांनी, राजस्थानचा 67 धावांनी आणि हिमाचल प्रदेशचा 9 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर, सौराष्ट्र संघाविरुद्ध 9 विकेट्स विजय मिळवत मुंबईने सेमीफायनल गाठले होते.
दुसरीकडे, आता फायनलमध्ये मुंबईचा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. रविवार 14 मार्चला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. गुजरातविरुद्ध पहिल्या सेमीफायनलमध्ये उत्तर प्रदेश संघाने 5 विकेटने विजय मिळवला.