Vijay Hazare Trophy 2021: मुंबईचा (Mumbai) कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 2021 मध्ये तिसऱ्यांदा 150 धावसंख्येचा टप्पा गाठला आणि कर्नाटकविरुद्ध (Karnataka) गुरुवार, 11 मार्च रोजी सेमीफायनल सामन्यात 165 धावांची धमाकेदार खेळी केली. कर्नाटक पृथ्वीने तुफान फटकेबाजी करत फक्त 79 चेंडूत शतक झळकावलं आणि एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या मयंक अग्रवलाचा (Mayank Agarwal) रेकॉर्ड मोडला आहे. मयंकने विजय हजारे ट्रॉफी 2017-18 च्या हंगामात 723 धावा केल्या होत्या. मयंकचा रेकॉर्ड तोडताना पृथ्वीने चार शतकं ठोकली आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमध्ये पुद्दुचेरीविरुद्ध 227 धावांच्या द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. शॉने तिसरे दीडशतक केवळ 111 चेंडूंमध्ये केले. शॉ अखेरीस 122 चेंडूंत 165 धावांवर बाद झाला आणि त्याने डावात 17 चौकार आणि 7 षटकार ठोकले. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत पृथ्वी सध्या मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. श्रेयस आणि सूर्यकुमार सध्या अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी अहमदाबाद येथे आहेत. (Prithvi Shaw याने चोपल्या नाबाद 185, एकत्र मोडला धोनी-विराटचा अनोखा रेकॉर्ड; मुंबई संघाची विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये धडक)
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यादरम्यान शॉ हा भारतीय संघाचा एक भाग होता, परंतु अॅडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात कमी स्कोअरमुळे त्याने आपले स्थान गमवावे लागले. अखेर इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळले गेले. तेव्हापासून शॉ मुंबईसाठी घरगुती क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात धावा करत आहे. यापूर्वी, सौराष्ट्राविरुद्ध शॉने नाबाद 185 धावा फटकावल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे मुंबईने नऊ गडी राखून विजय मिळविला. 123 चेंडूत त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने 42 ओव्हरमध्ये 286 धावांचा यशस्वी पाठलाग केला. पृथ्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो आणि फ्रँचायझीसाठी अशाच प्रकारच्या कामगिरीसह भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या तो प्रयत्नात असेल.
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये देवदत्त पडिक्क्ल आणि आर समर्थ यांचाही समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएल 2020 चा हंगाम पृथ्वीसाठी काही खास ठरला नाही. फ्रँचायझीने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला असला तरी मुंबईच्या सलामी फलंदाजाने 13 सामन्यांत दोन अर्धशतकांसह केवळ 228 धावा फटकावल्या.