पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

Vijay Hazare Trophy 2021: कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या तुफानी डावाच्या जोरावर मंगळवारी खेळल्या गेलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनल सामन्यात सौराष्ट्र (Saurashtra) संघाचा 9 विकेटने पराभव करत मुंबई संघाने सेमीफायनल फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत मुंबईचा (Mumbai) सामना 11 मार्च रोजी कर्नाटक संघाशी होईल. विजयाचा नायक ठरलेल्या पृथ्वीने 213 चेंडूत 21 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 185 धावा केल्या. यासह त्याने एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडला. भारतीय लिस्ट-ए क्रिकेटमधील लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीने सर्वात मोठा वैयक्तिक डाव खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असून यापूर्वी हा विक्रम माजी भारती कर्णधार धोनी आणि सध्याचा कर्णधार कोहलीच्या नावावर होता. 2005 मध्ये जयपूर येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्ध सामन्यात धोनीने 145 चेंडूंत नाबाद 183 धावा आणि कोहलीने ढाका येथे 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 148 चेंडूत 183 धावांची खेळी केली होती. (Vijay Hazare Trophy 2021: दिल्ली येथे होणार विजय हजारे ट्रॉफीच्या Knockouts सामन्यांचे आयोजन, 7 मार्चपासून होणार सुरुवात)

दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीच्या सध्याच्या हंगामात पृथ्वीने 6 सामन्यांत 196.3 च्या सरासरीने आणि 134.78 च्या स्ट्राइक रेटने 589 धावा केल्या आहेत. यामध्ये एक दुहेरी शतक आणि आणखी दोन शतकांचा समावेश आहे. पृथ्वीने दिल्ली विरुद्ध 105 धावा, पुडुचेरीविरुद्ध 227 धावा, आणि सौराष्ट्राविरुद्ध 185 धावा केल्या असून तिन्ही डावात तो नाबाद पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खराब फॉर्ममुळे भारतीय निवड समितीने पृथ्वीला टीम इंडियामधून बाहेर काढले होते. तथापि, त्याच्या शानदार फॉर्मसह त्याने भारतीय वनडे संघात पुनरागमन करण्याचा दावा ठोकला आहे. 23 मार्चपासून इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा होणे शिल्लक आहे.

दुसरीकडे, मुंबई संघासाठी पृथ्वी वगळता यशस्वी जयस्वालनेही 75 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी पृथ्वी आणि यशस्वीने 238 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर यशवी बाद झाला, मात्र यानंतर पृथ्वीने आदित्य तरे याच्यासह संघाला विजय मिळवून दिला. आदित्यने नाबाद 20 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध पहिले फलंदाजी केली आणि 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 284 धावा केल्या आणि मुंबईला विजयासाठी 285 धावांच टार्गेट दिले होते.