ICC U19 World Cup 2024 Semi-Final: अंडर-19 विश्वचषकत उपांत्य फेरीत पोहोचणारे चार संघ निश्चित, भारत भिडणार 'या' संघाशी
U19 Team India (Photo Credit - X)

U19 World Cup 2024 Semi-Final: 3 फेब्रुवारी रोजी आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 मधील (ICC U-19 World Cup 2024) सुपर सिक्स टप्प्यातील सर्व सामने संपल्यानंतर, उपांत्य फेरीत पोहोचणारे चार संघ देखील निश्चित झाले. भारतीय 19 वर्षाखालील संघ आणि पाकिस्तानने एका गटातून आपले स्थान निश्चित केले आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका 19 वर्षाखालील संघ दुसऱ्या गटातून आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरले आहेत. भारतीय अंडर-19 संघाने या स्पर्धेत आतापर्यंत अजेय कामगिरी केली आहे, ज्यामध्ये संघाने गट टप्प्यापासून सुपर सिक्सपर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेशी होईल, ज्याने सुपर सिक्सनंतर त्यांच्या गटात दुसरे स्थान पटकावले. (हे देखील वाचा: Rohit Sharma Caught Abusing On Stump Mic: कर्णधार रोहित शर्माने पुन्हा मैदानात केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल)

भारतीय संघ 6 फेब्रुवारीला उपांत्य फेरीचा सामना खेळणार (IND vs SA)

भारतीय अंडर-19 संघ 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेनोई विलोमोर पार्क येथे होणार आहे. या विश्वचषकात टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास बघितला तर त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिकेच्या अंडर-19 संघाचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 च्या प्रवासावर नजर टाकली तर ग्रुप स्टेजमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांना 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु याशिवाय उर्वरित 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आले. सुपर सिक्सच्या टप्प्यात झिम्बाब्वे अंडर 19 आणि श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील संघांना पराभूत करण्यात आफ्रिकन संघाला यश आले.

दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK)

अंडर 19 वर्ल्ड कप 2024 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी, पाकिस्तानच्या अंडर-19 संघाने एका रोमांचक सुपर सिक्स सामन्यात बांगलादेशच्या अंडर-19 संघाचा 5 धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, जर आपण ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाबद्दल बोललो तर त्यांनी देखील आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमधील स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.