IND vs NZ, CWC Semi Final: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा पराभव जिव्हारी, दोन चाहत्यांचा मृत्यू
(Photo Credit/Getty Image)

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर धर्म आहे, असे म्हटले जाते. याचेच एक उदाहरण बुधवारी झालेल्या भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) सेमीफायनल सामन्यानंतर पाहायला मिळाले. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करत भारतीय संघाला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचे विश्वचषकमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचा विश्वचषकमध्ये पराभव हे चाहत्यांसाठी मोठा धक्काच होता. मात्र, बिहार (Bihar) आणि कोलकाता (Kolkata) येथे हा धक्का पचवू न शकल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (ICC World Cup 2019: टीम इंडियाच्या पराभवानंतर कोच रवी शास्त्री यांच्यावर टांगती तलवार, पदावरून हकालपट्टीची शक्यता)

यापैकी पहिली घटना ही बिहारच्या किशनगंज येथे घडली. भारत-न्यूझीलंड सामना सुरु असताना अशोक पासवान (Ashok Paswan) यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. भारतीय फलंदाजांनी डाव सावरत धावा करायला सुरुवात केली होती. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी अशोक पासवान फटाके फोडत होते. मात्र, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि महेंद्र सिंघ धोनी (Mahendra Singh Dhoni) तंबूत परतल्यानंतर भारत हा सामना हारणार असे दिसू लागले. तेव्हा अशोक पासवान यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचे 'खबर सिमांचल'च्या वृत्तात म्हटले आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती 'खबर सिमांचल' या फेसबुक पेजच्या वार्ताहराने दिली आहे.

दरम्यान, दुसरी घटना घडली ती कोलकाता (Kolkata) येथे. श्रीकांता मैती (Srikant Maiti) या सायकल दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मैती आपल्या मोबाईल फोनवर भारत-न्यूझीलंडचा सामना पाहत होते. यावेळी धोनी बाद झाल्यानंतर मैती यांना हदयविकाराचा झटका आला. स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच यांचा मृत्यू झाला होता.