Photo Credit- X

U19 Women’s T20 World Cup: नुकत्याच पार पडलेला अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकावर भारतीय संघाने (Indian Women Cricket Team) आपले नाव कोरले. त्यानंतर आयसीसीने 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली. त्यातही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पहायला मिळाले. भारताच्या चार खेळाडूंचा त्यात समावेश आहे. त्रिशा गोंगाडी(Trisha Gongadi), जी कमलिनी (G Kamalini), वैष्णवी शर्मा (Vaishnavi Sharma) आणि आयुषी शुक्ला (Ayushi Shukla) यांचा 'टीम ऑफ द टूर्नामेंट' (Team of the Tournament) मध्ये समावेश आहे. तर संघाची कर्णधार कायला रेनेकेला करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेची खेळाडू जेम्मा बोथा हिला ही संघात स्थान देण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज न्थाबिसेंग निनीची 12 वी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्रिशाने विश्वचषकात 309 धावा केल्या. त्यामुळे ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. ज्यामध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या शतकाचाही समावेश आहे. अंतिम सामन्यात त्रिशाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.(India Wins ICC Women's U19 T20 World Cup 2025 Trophy: भारतीय महिला अंडर 19 संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेत्या ट्रॉफीवर नाव कोरले; दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने केले पराभूत)

2023 मध्ये भारताने टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा त्रिशाला संघात समाविष्ट करण्यात आले. 2025 च्या या स्पर्धेत तिने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही जिंकला. तिची सहकारी सलामीवीर, यष्टीरक्षक कमलिनी हिने स्पर्धेत 143 धावा केल्या.

फिरकी गोलंदाज वैष्णवीने विश्वचषकात 17 विकेट्स घेतल्या. तेवढ्या विकेट या विश्वचषकात कोणत्याही खेळाडूने घेतल्या नाहीत. ज्यामध्ये एका सामन्यात हॅटट्रिकचाही समावेश आहे. तर, आयुषीने 14 विकेट्स घेत दुसरे स्थान कायम राखले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघात कायलाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाची काओइमे ब्रे पाचव्या क्रमांकावर येते. तर मधल्या फळीत नेपाळची कर्णधार आणि अष्टपैलू पूजा महातो आहे. तिने 70 धावा केल्या आणि नऊ विकेट घेतल्या. या संघात श्रीलंकेचा गोलंदाज चामोदी प्रबोधाचा समावेश आहे जिने भारताविरुद्ध 16 धावांत 3 बळी घेतले होते.

2025 अंडर-19 महिला टी20 संघ

गोंगडी त्रिशा (भारत), जेम्मा बोथा (दक्षिण आफ्रिका), डेव्हिना पेरिन (इंग्लंड), जी कमलिनी (भारत), काओइमे ब्रे (ऑस्ट्रेलिया), पूजा महातो (नेपाळ), कायला रेनेके (कर्णधार) (दक्षिण आफ्रिका), केटी जोन्स ( यष्टीरक्षक) (इंग्लंड), आयुषी शुक्ला (भारत), चामोदी प्रबोध (श्रीलंका), वैष्णवी शर्मा (भारत) आणि न्थाबिसेंग निनी (दक्षिण आफ्रिका, 12वी खेळाडू)