भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 14 वर्षांपूर्वी या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या गौरवशाली प्रवासादरम्यान कोहलीला चेस मास्टर, रन मशीन आणि अनेक नवीन नावे मिळाली. पण तुम्हाला माहित आहे का, कोहलीची त्याच्या पहिल्या सामन्यात कामगिरी कशी होती? नसल्यास, आम्ही तुम्हाला सांगू. विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला. अंडर-19 विश्वचषक जिंकून भारतीय संघात (India Team) थेट स्थान मिळवलेल्या विराट कोहलीला तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) डावाची सलामी देण्याची संधी दिली होती. श्रीलंकेविरुद्धच्या या 50 षटकांच्या सामन्यात कोहली गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर गंभीर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि दुसऱ्या टोकाला कोहली अजूनही पहिला चेंडू खेळण्याची वाट पाहत होता.
कोहली पहिल्याच सामन्यात ठरला होता फ्लॉप
या सामन्यात कोहलीला चामिंडा वास, नुवान कुलसेकरा आणि मुथय्या मुरलीधरसारख्या गोलंदाजांचा सामना करावा लागला. सुरुवातीपासूनच कोहली थोडा स्ट्रगल करताना दिसला. 7व्या षटकात त्याने लेग साइडमध्ये चौकार मारून संघाला पहिला चौकार मिळवून दिला. पुढच्याच षटकात कोहलीला कुलशेखराने एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा पहिला डाव संपुष्टात आला. कोहलीला पहिल्या सामन्यात 22 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या होत्या. सलामीवीर म्हणून कोहली पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरला होता.
या 5 सामन्यांच्या मालिकेतील पुढील चार सामन्यांमध्ये कोहलीला सलामीची संधी मिळाली आणि त्याने अनुक्रमे 37, 25, 54 आणि 31 धावा केल्या. कोहलीने प्रत्येक वेळी चांगली सुरुवात केली पण तो एकदाच 50 धावांचा टप्पा पार करू शकला. या मालिकेतून कोहलीला खूप काही शिकायला मिळाले आणि इथूनच त्याचा किंग कोहली होण्याचा प्रवास सुरू झाला. (हे देखील वाचा: Virat Kohli चा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाढणार पाकिस्तानचे टेन्शन, 28 तारखेला होणार सामना)
कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
18 ऑगस्ट 2008 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने 12 जून 2010 रोजी पहिला टी20 आणि 20 जून 2011 रोजी पहिला कसोटी सामना खेळला. कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतकांसह 12344 धावा आहेत. त्याच वेळी, त्याने टी-20 आणि कसोटीमध्ये अनुक्रमे 3308 आणि 8074 धावा केल्या आहेत. कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 27 शतके झळकावली आहेत.