AUS vs IND (Photo: @CricketAus/@BCCI)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team:  ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. टीम इंडियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी आपल्या ताब्यात ठेवली आहे. ही परंपरा त्यांना पुढे चालू ठेवायची आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे आहे.

गुलाबी चेंडू कसोटीत दोन्ही संघांची आकडेवारी

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील 2024-25 मधील दुसरी कसोटी ॲडलेड ओव्हल येथे गुलाबी चेंडूने खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियन संघ गुलाबी चेंडूने आतापर्यंत 12 कसोटी खेळला आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 11 सामने जिंकले आहेत, तर केवळ 1 सामना गमावला आहे. तर, टीम इंडियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूने एकूण 4 सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 3 जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना गमावला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ दमदार पुनरागमन करू इच्छितो. रोहित शर्मा दुसरा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत या मैदानावरील दोन्ही संघांच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी अशी झाली आहे

1884 मध्ये ऑस्ट्रेलियाने येथे पहिला सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 45 सामने जिंकले असून 18 सामने गमावले आहेत. तर 19 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर बनवलेली सर्वोच्च धावसंख्या 674 धावांची आहे, जी 1948 मध्ये टीम इंडियाविरुद्ध नोंदवली गेली होती. माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (1743 धावा) ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक विकेट्स नॅथन लियॉनच्या (63 विकेट्स) नावावर आहेत.

हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2024: पहिल्यांदाच पिंक बाॅल कसोटीत खेळणार हे 3 भारतीय स्टार खेळाडू, करु शकतात मोठी कामगिरी

ॲडलेडमध्ये टीम इंडियाची कामगिरी

या मैदानावर टीम इंडियाने 1948 साली पहिला सामना खेळला होता. या मैदानावर टीम इंडियाने 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 8 सामने गमावले आहेत. संघाला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर टीम इंडियाने 2008 साली 526 धावा केल्या होत्या. या मैदानावर विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 509 धावा केल्या आहेत. या मैदानावर माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर सर्वाधिक 19 विकेट आहेत.

ॲडलेड, ओव्हल मैदानाबद्दल इतर महत्त्वाची माहिती

ॲडलेड ओव्हल मैदान 1873 मध्ये बांधण्यात आले. या मैदानावर सुमारे 50,000 प्रेक्षक सामना पाहू शकतात. हे तेच मैदान आहे जिथे टीम इंडिया 2020-21 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अवघ्या 36 धावांत ऑलआऊट झाला होता. तो सामनाही गुलाबी चेंडू कसोटीचा होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेटने जिंकला. मात्र, या पराभवानंतरही टीम इंडियाने ती मालिका जिंकली.