Virat Kohli (Photo Credit - X)

मुंबई: विराट कोहलीची (Virat Kohli) गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. गेल्या दशकात कोहलीने क्रिकेटमध्ये स्वत:चे एक खास स्थान निर्माण केले आहे. जोपर्यंत कोहली क्रीजवर आहे. तोपर्यंत टीम इंडिया (Team India) हा सामना जिंकू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. तो मायदेशात खेळत असो किंवा परदेशात, त्याने प्रत्येक परिस्थितीत टीम इंडियासाठी धावा केल्या आहेत. त्याच्याकडे उत्कृष्ट तंत्र आणि फलंदाजीचे कौशल्य आहे. एकदा तो क्रीजवर आला की तो मोठी खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. परंतु काही काळापासून हे दिसून आले नाही. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराट, बुमराह किंवा पंत नाही तर रोहित शर्माने 'या' दोन खेळाडूंचा केला बचाव)

2024 मध्ये विराट कोहलीची खराब कामगिरी

2024 मध्ये विराट कोहली नावाप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. गेल्या 8 कसोटी डावांमध्ये कोहलीच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे. त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 सामने खेळून एकूण 483 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 21.95 आहे. कोहलीची त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही वर्षात इतकी कमी सरासरी झालेली नाही. खराब फलंदाजीमुळेच तो या स्थानावर पोहोचला आहे.

2008 मध्ये त्याची होती सर्वात वाईट सरासरी

पण 2024 हे वर्ष अजून संपलेले नाही आणि येत्या सामन्यांमध्ये जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याची सरासरी थोडी वाढण्याची शक्यता आहे. याआधी 2008 मध्ये त्याची सर्वात वाईट सरासरी होती. त्यानंतर त्याने एकूण 5 सामने खेळले आणि 159 धावा केल्या आणि त्याची सरासरी 31.80 होती. कोहलीने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विराट कोहलीची वार्षिक सरासरी:

वर्ष 2008- 31.80

वर्ष 2009- 54.16

वर्ष 2010- 48.61

वर्ष 2011- 39.14

वर्ष 2012- 53.31

वर्ष 2013- 53.13

वर्ष 2014- 55.75

वर्ष 2015- 38.44

वर्ष 2016- 86.50

वर्ष 2017- 68.73

वर्ष 2018- 68.37

वर्ष 2019- 64.60

वर्ष 2020- 36.60

वर्ष 2021- 37.07

वर्ष 2022- 38.51

वर्ष 2023- 66.06

वर्ष 2024- 21.95

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकांची नोंद 

तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता आणि त्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतली. सध्या त्याचे लक्ष पूर्णपणे कसोटी आणि वनडेवर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक शतके करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्या नावावर 80 शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने 117 कसोटी सामन्यात 9035 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13906 धावा आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4188 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या हिमालयासारखा विक्रम कोणता खेळाडू गाठू शकला असेल तर तो कोहली आहे.