IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवार, 4 डिसेंबर रोजी ढाका येथे होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेसह भारतीय संघ मिशन वनडे विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करणार आहे. भारतासाठी या मालिकेत असे अनेक खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात.
राहुल त्रिपाठी
या मालिकेसाठी राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार आणि कुलदीप सेनसारखे खेळाडू भारतासाठी पदार्पण करू शकतात. भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंना नव्या संघात संधी देऊ शकतो. राहुल त्रिपाठीबद्दल सांगायचे तर, तो अनेक मालिकांसाठी भारतीय संघाचा भाग आहे, परंतु त्याला भारतासाठी पदार्पणाची संधी मिळू शकली नाही. राहुल त्रिपाठीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 76 सामन्यांमध्ये 140.80 च्या स्ट्राइक रेटने आणि 28.09 च्या सरासरीने 1798 धावा केल्या आहेत.
रजत पाटीदार
या मालिकेतील दुसरे मोठे नाव म्हणजे रजत पाटीदार, जो भारतासाठी पदार्पण करू शकतो. आरसीबीसाठी 2022 मध्ये रजत पाटीदारने जोरदार पाऊस पाडला. त्याने या मोसमातील 8 सामन्यात 40.40 च्या सरासरीने आणि 144.29 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा केल्या. त्याच वर्षी त्याने शानदार शतकही झळकावले. रजत पाटीदार या मालिकेत भारताकडून पदार्पण करण्याचा प्रबळ दावेदार आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN ODI 2022: आणखी एक 'विराट' शतक लवकरच येणार? बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीची आकडेवारी थक्क करणारी)
कुलदीप सेन
या यादीत तिसरे नाव आहे कुलदीप सेन, या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2022 साली राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्याने सर्वांना प्रभावित केले. आयपीएलच्या 7 सामन्यात 8 विकेट्स घेऊन हा हंगाम त्याच्यासाठी खूप खास होता. मात्र, या मालिकेत त्याचे पदार्पण करणे कठीण दिसत आहे. पण या मालिकेदरम्यान खेळाडूच्या बदली म्हणून तो संघात आपले स्थान निर्माण करू शकतो.