भारतीय क्रिकेटपटूंचे हे अनोखे 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स जे कदाचितच तुम्हाला माहिती असतील, जाणून व्हाल आश्चर्यचकित
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

क्रिकेटमध्ये बर्‍याचदा रेकॉर्डस् बनले आणि मोडले जातात. क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी भारतात तर क्रिकेट (Cricket in India) हा धर्म मानला जातो. वर्ल्ड कपपासून ते अ‍ॅशेस कसोटी मालिकेपर्यंत सर्व स्पर्धा क्रिकेटप्रेमी आवर्जुन पाहतात. अपेक्षेनुसार खेळाचे बरेच प्रमुख रेकॉर्ड्स भारतीय क्रिकेटपटूंच्या (Indian Cricketers) नावावर आहेत. काहींना तर नेक नावाजलेल्या खेळाडूंचे रेकॉर्ड अगदी तोंड पाठ असतात, पण तुम्हाला माहित आहे की असे काही विश्वविक्रम आहे जे फक्त भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटचे असे अनोखे विक्रम सांगणार आहोत जे भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत आणि त्यांना मोडणे आजवर कोणत्याही क्रिकेटपटूला शक्य झाले नाही व येत्या बऱ्याच काळात ते कायम राहतील. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम महान भारतीय सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे.

आज आपण क्रिकेटच्या अशाच काही 5 विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यावर भारतीयांचे राज्य आहे...

1. वनडे सामन्यात सर्वाधिक दुहेरी शतके

वनडे क्रिकेटमध्ये 200 धावांचा टप्पा ओलांडणारे मोजकेच फलंदाज आहेत. 50 ओव्हर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने पहिले आणि एकमेव दुहेरी शतक ठोकले, तर त्याचा साथीदार रोहित शर्माने हा पराक्रम एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा केला आहे. रोहितने पहिले दुहेरी शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले तर श्रीलंकाविरुद्ध त्याने दोन दुहेरी शतकांची नोंद केली आहे. इतकंच नाही तर श्रीलंकाविरुद्ध त्याने वनडेमध्ये फलंदाजाने केलेल्या 264 धावांचा डाव खेळला.

2. युवराज सिंहचे 12 चेंडूत टी-20 अर्धशतक

2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-इंग्लंड सामना कदाचितच क्रिकेटप्रेमी विसरु शकतात. युवराज सिंहने 12 चेंडूत न फक्त अर्धशतक ठोकले, तर स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार देखील ठोकले.

3. 21 मेडन ओव्हर

मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या बापू नाडकर्णीने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सलग 131 चेंडू गोलंदाजी केली आणि यामध्ये त्यांनी एकही धाव दिली नाही. त्यांनी 32 ओव्हरपैकी 27 मेडन ओव्हर टाकले ज्यातील सलग 21 ओव्हर मेडन राहिले. या दरम्यान त्यांचे गोलंदाजी विश्लेषण 32-27-5-0 असे होते.

4. वर्ल्ड कपमध्ये सार्वधिक धावा

वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त धावा केल्या नाहीत किंवा त्याच्या आकड्याच्या जवळही येऊ शकले नाहीत. सचिनने या स्पर्धेत 2,278 धावा केल्या आहेत. 2003 मध्ये नामिबियाविरुद्ध विश्वचषकातील 151 चेंडूत सर्वाधिक 152 धावा केल्या होत्या. शिवाय, त्याने 11 सामन्यात स्पर्धेतील सर्वाधिक 673 धावा केल्या. रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर सचिनच्या या विक्रमाच्या जवळ आले पण ते साध्य करण्यात अपयशी ठरले.

5. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावी फलंदाज राहुल द्रविडने 16 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आहे. त्याच्या कसोटी कारकीर्दीत त्याने 31,258 चेंडूंचा सामना केला आहे. द्रविडनंतर मास्टर-ब्लास्टर सचिनने 29,437 चेंडू खेळले आहेत. इतकंच नाही तर द्रविडने कसोटी सामन्यांमध्ये क्रीजवर 44,152 मिनिटे घालविली आहेत म्हणजेच जवळजवळ 736 तास आहेत, जो की एक जागतिक विक्रम आहे.