The Hundred Cricket: टीम इंडियाच्या या 5 महिला सुपरस्टार खेळणार ब्रिटिशांची ‘द हंड्रेड’ लीग, जाणून कोणाचा कोणत्या संघात समावेश
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना (Photo Credit: Instagram)

The Hundred Cricket: इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ (The Hundred) लीगच्या उद्घाटन हंगामात पाच वेगवेगळ्या संघांमध्ये भारतीय महिला सुपरस्टार खेळाडू झळकणार आहेत. स्मृती मंधाना (Smriti Mandhana), शेफाली वर्मा (Shafali Verma), टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि फलंदाज जेमिमाह रॉड्रिगज (Jemimah Rodrigues) अशा पाच खेळाडू ब्रिटिश लीगमध्ये सहभाग घेणार असल्याची पुष्टी 'द हंड्रेड'ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केली. भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत मँचेस्टर ओरिजिनल्स संघाकडून खेळेल तर उपकर्णधार स्मृती मंधाना सदर्न ब्रेव्ह कडून मैदानात उतरेल. दीप्ती लंडन स्पिरीट फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करेल, तर रॉड्रिग्स नॉर्दर्न सुपरचार्जर्स (Northern Superchargers) संघासाठी खेळेल. नंबर 1 टी-20 फलंदाज शेफालीला बर्मिंघम फिनिक्सने (Birmingham Phoenix) आपल्या संघात सामील केले आहे. (The Hundred स्पर्धेत झळकणार चार भारतीय महिला खेळाडू, BCCI ने दिले NOC)

भारतीय महिला संघ (India Women's Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून 16 जून पासून दोन्ही यजमान इंग्लंड विरोधात एकमेव कसोटी सामना खेळणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघात वनडे व टी-20 मालिका खेळली जाईल ज्यांनंतर महिला संघातील बहुतेक सदस्य मायदेशी परततील, तर वरील 5 खेळाडू 'द हंड्रेड' लीगसाठी ब्रिटिश देशात आणखी काही वेळ घालवतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची ही महत्वाकांक्षी स्पर्धा गेल्या वर्षीच आयोजित केली जाणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. आता याची सुरुवात 21 जुलैपासून होईल, ज्यात पुरुष व महिला स्पर्धा एकाचवेळी सुरू राहतील. या दोन्ही प्रकारात प्रत्येकी 8 संघ असतील आणि 100 ओव्हरचा खेळ रंगेल. बीसीसीआयने यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंना परवानगी दिली आहे तथापि, भारतीय पुरुष खेळाडूंना या लीगमध्ये भाग घेता येणार नाही.

भारताची ज्येष्ठ सर्वाधिक खेळाडू आणि कर्णधार हरमनप्रीत मॅन्चेस्टर ओरिजिनल्स संघाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार असून नवीन स्पर्धेबद्दल कौर खूप उत्साही आहे. आपली उत्सुकता दाखवत हरमनप्रीत म्हणाली, “हे खूप आनंददायक आहे की मी द हंड्रेडच्या पहिल्याच सामन्यात खेळणार आहे. इतिहास रचणे, विशेषत: अशा मोठ्या मैदानावर महिलांच्या सामन्यासह विशेष असेल. आम्ही भारतातील काही मोठ्या प्रेक्षकांसमोर खेळलो आहोत आणि खेळाडूंसाठी हा नेहमीच एक चांगला अनुभव असतो,” असं ती म्हणाली.