IND W vs ENG W U19 Women’s T20 WC Finale 2023: टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, इंग्रजाविरुद्ध 2017 चा बदला घेण्यासाठी शेफाली वर्माचा संघ तयार
Team India (Photo Credit - Twitter)

भारताचा 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीत टीम इंडिया फायनलमध्ये (U19 Women’s T20 WC Finale) पोहोचली असून आता त्यांचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG) होणार आहे. उपांत्य फेरीत शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शुक्रवारी न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने केवळ 99 धावांनी बचाव करताना ऑस्ट्रेलियन संघाचा 3 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम सामना रविवार, 29 जानेवारीला होणार आहे. भारतीय महिला क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, अनेक दिवसांपासून देश विश्वचषकाची वाट पाहत आहे.

भारताचा वरिष्ठ महिला संघ 2017 च्या विश्वचषकात फायनल जिंकण्याच्या मार्गावर असताना अचानक इंग्लंडच्या गोलंदाजांनी डाव फिरवला आणि टीम इंडियाने जिंकलेला सामना गमावला. त्या दु:खावर माती टाकून ती विसरण्याची जबाबदारी आता या तरुणींवर आली आहे. भारताच्या या तरुण सिंहिणींना 2017 चा बदला घेण्याची संधी आहे. विशेष म्हणजे मिताली राजच्या संघासमोर तेव्हा फक्त इंग्लंडचे आव्हान होते. येथेही शेफालीची सेना इंग्लंडशी भिडणार आहे. 2017 च्या त्या पराभवाचा बदला पूर्ण करून शेफाली ब्रिगेडला इतिहास रचायचा आहे. (हे देखील वाचा: IND-W vs SA-W T20 Tri-Series: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार काटेची टक्कर, दोन्ही संघात कोण आहे वरचढ; पहा आकडेवारी)

या भारतीय खेळाडूंवर असेल नजर

सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत, 18 वर्षीय फलंदाज श्वेता सेहरावतने भारतासाठी अपवादात्मक कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत 6 सामन्यात 292 धावा केल्या आहेत आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू देखील आहे. श्वेताने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 45 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या होत्या. टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्मा त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिने 6 सामन्यात 157 धावा केल्या आहेत. शेफालीची गोलंदाजीही चर्चेचा विषय ठरली आहे. उपांत्य फेरीत तिने 4 षटकात केवळ 7 धावा देत एक विकेट घेतली. त्याचबरोबर लेगस्पिनर पार्श्वी चोप्रा गोलंदाजीमध्ये जबरदस्त आहे. तिने आतापर्यंत 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. पार्श्वी उपांत्य फेरीतही सामनावीर ठरली. तेथे तिने 20 धावांत तीन बळी घेतले.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

भारत: शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, एस यशश्री, हर्षिता बसू (विकेट कीपर), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाझ आणि शबनम एमडी.

इंग्लंड: एली अँडरसन, हॅना बेकर, जोसी ग्रोव्ह्स, लिबर्टी हीप, नियाम हॉलंड, रायना मॅकडोनाल्ड-गे, एम्मा मार्लो, चॅरिस पॉवेली, डेविना पेरिन, लिझी स्कॉट, ग्रेस स्क्रिव्हन्स (कर्णधार), सोफिया स्मेल, सेरेन स्मेल, अलेक्सा स्टोनहाउस आणि मॅडी वॉर्ड.