Team India in 2021: अखेर 2020 वर्ष संपूर्ण 2021 ची सुरुवात झाली आहे. 2020 हे वर्ष सर्वांच्याच लक्षात राहणार आहेत. कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या वर्षात क्रीडाक्षेत्रही काही महिने ठप्प झाले होेते. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु झाले आणि आता हळुहळू क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाबद्दल (Indian Cricket Team) बोलायचे झाल्यास सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) आहे. शिवाय, 2021 भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी अनेक मोठ्या स्पर्धांची पर्वणी घेऊन आले आहेत. मागील वर्ष भारतीय संघासाठी काही खास ठरले नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे आणि कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकाही रद्द झाली. काही महिन्यांनंतर आयपीएल सुरु झाले, पण ते देखील परदेशात. त्यांनतर टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली, त्यामुळे मागील संपूर्ण वर्ष संघासाठी चढ उताराचे होते. मात्र, यंदा टीम इंडिया (Team India) चाहत्यांना आयसीसी स्पर्धांपासून अनेक क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटायाला मिळणार आहे. (Year-Ender 2020: 'या' 5 खेळाडूंनी 2020 मध्ये ठोकल्या सर्वाधिक टेस्ट धावा, टीम इंडियासाठी 'हा' फलंदाज ठरला नंबर-1)

इंग्लंडचा भारत दौरा: 5 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान, इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान, दोन्ही संघ चार टेस्ट, पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिकेत आमने-सामने येतील. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पहिला दिवस/रात्र टेस्ट सामना आयोजित केला जाईल.

आयपीएल 2021: इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर एप्रिल-ते मे महिन्यात आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होईल. यंदा भारतात कोरोनाची स्थिती थोडी सुधारली असल्याने स्पर्धेचे आयोजन देशात होणे अपेक्षित आहे.

श्रीलंका दौरा आणि आशिया कप: आयपीएलचा हंगाम संपुष्टात येताच संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होईल. सर्वप्रथम इथे 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. यानंतर आशिया चषकचे देखील आयोजन होणार आहे. या दरम्यान, भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येतील. शिवाय, टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने आशिया कप टी-20 महत्वाचे ठरेल.

इंग्लंड दौरा: त्यानंतर जुलै 2021 मध्ये टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. इंग्लंड हे एक ठिकाण आहे जिथे विराट कोहलीच्या टीम इंडियाला अद्याप कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि मागील दौऱ्यावर 1-4 असा पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका संपूर्ण वर्षातील भारतीय संघासाठी सर्वात आव्हानात्मक मालिका असेल.

टी-20 वर्ल्ड कप: आयसीसीची ही स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाने ही स्पर्धा जिंकलेली नाही, शिवाय, यंदा स्पर्धा देशात आयोजित होणार असल्याने टीम इंडियाला ही स्पर्धा जिंकणे नक्कीच आवडेल.