T20 World Cup 2021: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत पाकिस्तान संघाला फायदा होईल, असे मत विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) व्यक्त केले आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांनी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे यंदाची स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केल्यावर अकमलने वक्तव्य केले. अकमलच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान युएईमध्ये (UAE) दशकापेक्षा अधिक काळ खेळत आहे, ज्यामुळे त्यांना परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे वाचण्यात मदत होईल. 2009 मध्ये लाहोर हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानात फारच कमी झाले. या दरम्यान युएई पाकिस्तानचे घरचे सामने खेळण्यासाठी पर्यायी जागा म्हणून उदयास आला. याखेरीज पाकिस्तान सुपर लीगचे पहिले काही सीझन युएईमध्ये खेळले गेले होते. (T20 World Cup 2021: भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कपला यूएईमध्ये हलवला जाणार, BCCI आज ICC ला देणार माहिती)
पीएसएल 2021 चा दुसरा टप्पा देखील तिथे आयोजित करण्यात आला होता. “टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला फायदा होईल. आम्ही युएईमध्ये 9 ते 10 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. ही स्थिती पाकिस्तानला या परिस्थितीत सर्वात अनुभवी बाजू बनवते,” 'माय मास्टर क्रिकेट कोच' या यूट्यूब चॅनलशी बोलताना अकमल यांनी स्पष्टीकरण दिले. गेल्या अनेक वर्षात युएईमध्ये अनेक टी-20 सामने आयोजित केले होते. यावर्षी सुरूवातीस निलंबित झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होणार होता, तर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) नुकताच अबू धाबी येथे आयोजित करण्यात आला होता. या लीगमध्ये अनेक परदेशी खेळाडू सहभागी होत असल्याने, युएईमध्ये खेळण्याच्या अनुभवाचा त्यांनाही फायदा होईल असे अकमलचे मत आहे.
आयसीसी वर्ल्ड टी-20 वर्ल्ड कपची आगामी आवृत्ती देशातील सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात येणार आहे. यापूर्वी सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली की मंडळाने आयसीसीला आयोजनाविषयी माहिती दिली आहे. “टी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवला जाऊ शकतो, अशी माहिती आम्ही आयसीसीला अधिकृतपणे दिली आहे. त्याचा तपशील स्पष्ट केला जात आहे,” गांगुलीने पीटीआयने नमूद केले आहे.